मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घोषित करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये समाविष्ट असलेल्या राज्यातील मान्यवरांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. यावर्षीच्या पद्म पुरस्कारार्थींमध्ये राज्यातील ८ मान्यवरांचा समावेश आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पद्मविभूषण, डॉ. तेहेम्टन उदवाडिया यांना वैद्यकीय सेवेसाठी पद्मभूषण तर प्रसिद्ध गायक कैलास खेर व अनुराधा पौडवाल, लेखिका भावना सोमय्या, पाककला तज्ज्ञ संजीव कपूर, ज्येष्ठ निरु पणकार आप्पासाहेब धर्माधिकारी, समाजसेवक डॉ. मापूस्कर (मरणोत्तर) यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. सर्व मान्यवरांचे योगदान मोलाचे आहे. शरद पवार यांनी गेली ५० वर्षे संसदीय लोकशाहीत मोठे योगदान देताना विविध महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. भारतीय लोकशाहीत सक्षमपणे योगदान देणारा नेता ही त्यांची ओळख आहे. पद्मविभूषण पुरस्काराने त्यांचा उचित सन्मान झाल्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी नानासाहेब धर्माधिकारी यांचा वारसा समर्थपणे चालविताना अध्यात्माच्या माध्यमातून केलेले समाजप्रबोधनाचे कार्य प्रशंसनीय असून महाराष्ट्रातील स्वच्छता अभियानात त्यांचा सहभाग मोलाचा राहिला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)
राज्यातील पद्म पुरस्कारार्थींचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
By admin | Published: January 26, 2017 5:34 AM