आज चार राज्यांचे निकाल लागले जे जिंकले त्यांचे अभिनंदन करतो. अगदी मोकळ्या मनाने करतो. निकाल अपेक्षित अनपेक्षित, हे ज्याचं ते बघतील. पण जे-जे जिंकले त्या सर्वांचं अभिनंदन. यालाच लोकशाही म्हणतात. अशीच लोकशाही देशात टिकायला हवी आणि ती टिकावी यासाठीच आपण लढत आहोत. 2024 ची निवडणूक यासाठी महत्वाची आहे की, आता जशा निवडणुका होत आहेत. तशाच त्या 2024 नंतरही होत राव्यात. हे जनतेने ठरवावे. पूर्वी एक म्हण होती यथा राजा तथा प्रजा, तशीच लोकशाहीत यथा प्रजा तथा राजा. प्रजा ठरवते राजा कोण असावा. पण ते ठरवण्याचा अधिकार राहातो की जातो? असं जेव्हा वाटायला लागलं तेव्हा आपण लढायला उभे राहिलो आहोत, असे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. दिनानाथ सभागृह, विलेपार्ले येथील नवनियुक्त शिवसेना नेत्यांच्या सन्मान सोहळ्यात ते शिवसैनिकांशी बोलत होते.
बंगाल आणि महाराष्ट्राची परंपरा आपल्या पुढे न्यायची आहे -महाराष्ट्र आणि बंगालची एक परंपरा आहे. अन्यायाच्या विरोधात लढण्याची. जेवढे क्रांतिकारक महाराष्ट्र आणि बंगालने दिले आणि देशाच्या स्वातंत्र्यात जे योगदान दिले, ती बंगाल आणि महाराष्ट्राची परंपरा आपल्या पुढे न्यायची आहे. या देशात लोकशाही टिकावी यासाठी आपण उभे राहिलो आहोत.
गद्दारी शिवसेनेशी नाही, महाराष्ट्राशी -आतासुद्धा जे मिंधे तिकडे गेले आहेत, त्यांना कळत नाहीय आपण काय करत आहोत? गद्दारी शिवसेनेशी नाही, महाराष्ट्राशी, महाराष्ट्राच्या मातीशी ते करत आहेत! केवळ सत्तेच्या स्वार्थासाठी त्यांची धुनी भांडी करतायत. त्यांना कळत नाही, अरे तुम्ही आईची पूर्णपणे विटंबना होतेय आणि ती उघड्या डोळ्याने बघतायत. जीव जळतोय. आम्ही लढू आणि देशाला वाचवू. एवढेच नाही, तर आपल्या स्वाभिमानासाठी ज्या शिवसेनेचा जन्म झाला, ती संपवायला जे निघाले, त्यांना संपवल्याशिवाय राहायचं नाही." असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे.