श्रीनिवास नागे, सांगलीजिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत घराणेशाहीचा झेंडा फडकविताना जिल्ह्यातील मंत्री, आमदार, खासदारांच्या कुटुंबीय व जवळच्या नातलगांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कुटुंबीय व नातलगांच्या आडून घरातच सत्ता ठेवण्याचा या नेतेमंडळींचा प्रयत्न आहे. कृषी, पणन, पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत यांनी बागणी (ता. वाळवा) जिल्हा परिषद गटातून रयत विकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचे पुत्र सत्यजित नाईक शिराळा तालुक्यातील वाकुर्डे बुद्रूक पंचायत समिती गणातून भाजपातर्फे, तर याच तालुक्यातील कोकरूड जिल्हा परिषद गटातून विधान परिषदेचे माजी सभापती आ. शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजित देशमुख कॉँग्रेसतर्फे मैदानात उतरले आहेत. शिराळ्यातील मांगले जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या भावजय अश्विनी राष्ट्रवादीकडून लढत असून, त्यांचा सामना भाजपाकडून लढणाऱ्या चुलत जाऊबाई अनन्या नाईक यांच्याशी होत आहे.जत येथील भाजपाचे आमदार विलासराव जगताप यांचे पुत्र मनोज जगताप यांनी तालुक्यातील तिकोंडी पंचायत समिती गणातून, खानापूर-आटपाडी मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर नागेवाडी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेतर्फे रिंगणात उतरले आहेत, तर माजी आमदार, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील यांचे पुत्र विशाल यांनी त्यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. विधान परिषदेचे आमदार मोहनराव कदम यांच्या स्नुषा वैशाली शांताराम कदम देवराष्ट्रे (ता. कडेगाव) गटातून काँग्रेसतर्फे नशीब अजमावत असून, आ. पतंगराव कदम यांचे जावई महेंद्र लाड कुंडल (ता. पलूस) जिल्हा परिषद गटातून काँग्रेसतर्फे राष्ट्रवादीशी सामना करत आहेत. माजी आमदार व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव शिंदे वाळवा तालुक्यातील बागणी गटातून राष्ट्रवादीतर्फे लढत आहेत. पक्षाचे नेते माजी मंत्री आ. जयंत पाटील यांचे पुतणे देवराज पाटील यांनी कासेगाव पंचायत समिती गणातून आणि पुतणी संगीता संभाजी पाटील यांनी कासेगाव गटातून राष्ट्रवादीतर्फे अर्ज भरला आहे. खासदार संजयकाका पाटील यांचे चुलते डी. के. पाटील हे चिंचणी जिल्हा परिषद गटातून भाजपाच्या वतीने गड सांभाळत आहेत. आटपाडीचे माजी आमदार व नुकतेच राष्ट्रवादीतून भाजपामध्ये आलेले राजेंद्रअण्णा देशमुख यांचे पुत्र हर्षवर्धन आटपाडी गणातून लढत आहेत.
सांगली जिल्ह्यात नातलगांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2017 11:51 PM