मुंबई : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला. यावेळी त्यांच्यासोबत बंडखोर आमदार अब्दुल सत्तारही होते. सत्तार यांनी काँग्रेसचे 8 ते 10 आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. तर विखेपाटलांनी राजीनामा दिल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांमुळे आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे नाराज झालेल्या आमदारांवर भाजपात जाण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील नेते पक्षाला संपवत असल्याचा आरोपही त्यांनी अशोक चव्हाण यांचे नाव न घेता केला.
अब्दुल सत्तार यांनी काल भाजपाचे महत्वाचे नेते गिरीष महाजन यांची भेट घेतली होती. यानंतर आज राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी नाराज आमदारांसोबत बैठकही घेतली होती. तसेच विखे पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला तेव्हाही सत्तार सोबत होते. मात्र, विखे पाटलांनी आपल्यासोबत कोणताही आमदार नसल्याचा दावा केला होता.
माझ्या सोबत कुणीही नाही. ज्यांची नावे घेतली जात आहेत ते केवळ माझे मित्र आहेत. त्यांची उगाच नावे घेणे योग्य नाही. भाजपमध्ये कधी प्रवेश करणार हे लवकरच जाहीर करेन. मात्र, मंत्रिपद देणार की नाही हा निर्णय त्या पक्षाचा असेल, असे राजीनामा दिल्यानंतर विखे पाटलांनी स्पष्ट केले होते.
तसेच विखे पाटलांनीही आपण केंद्रीय नेतृत्वावर नाराज नसल्याचे सांगितले. उलट त्यांनी संधी दिल्यानेच विरोधी पक्षनेता बनता आले. मी चांगले काम करण्याचा प्रयत्न केला मात्र परिस्थितीने मला राजीनामा देण्यास भाग पाडल्याचे विखे यांनी यावेळी सांगितले.