अजित मांडके,
ठाणे- महापालिका निवडणुकीत आघाडी करुन लढायचे असा निर्णय काँग्रेस- राष्ट्रवादीने घेतला आहे. त्यानुसार आघाडी झाली असली तरी अद्यापही काही जागांवरुन दोन्ही पक्षांमध्ये तू तू मै मैं सुरु आहे. यामुळे काँग्रेसने आता पुन्हा २०१२ चाच फॉर्म्युला पुढे केला आहे. त्यानुसार राष्ट्रवादीला ७० आणि काँग्रेस स्वत: ६० जागांवर लढेल, असा हा फॉर्म्युला असून त्यानुसारच आघाडी व्हावी अशी काँग्रेस नेत्यांची इच्छा आहे. संपूर्ण ठाणे शहरासाठीचा तो असल्याचेही त्यांचे म्हणणे असून यामध्ये कळवा, मुंब्राही धरले आहे. शिवसेना, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादीने आघाडी करण्याचे ठरविले. ती होत असतांना राष्ट्रवादीने सुरुवातीलाच कळवा, मुंब्रा भागाला वगळले असून आघाडी ही शहरासाठी असल्याचे स्पष्ट केले. कळवा, मुंब्रा पट्यात राष्ट्रवादीचा वरचष्मा असून, काँग्रेसही मुंब्य्रात राष्ट्रवादीच्या बरोबरीत आहे. त्यामुळे, काँग्रेसही या ठिकाणी आग्रही असल्याचे चित्र आहे. दोन्ही पक्षांची अशी भूमिका असल्याने राष्ट्रवादी या पट्यात मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयारी करीत आहे. परंतु, कळवा, मुंब्य्रात अशा प्रकारे लढत करीत असतांना दुसरीकडे राष्ट्रवादीने ठाण्यात अनेक ठिकाणी चारचे अख्खे पॅनलच आपल्या बाजूने वळविण्यासाठी जोर लावला आहे. त्यामुळे केवळ राष्ट्रवादीकडून काँग्रेसचा वापर करण्याचेच काम सुरु असल्याचा सूर उमटत होता.काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेत कळवा, मुंब्रा हादेखील ठाण्याचाच एक भाग असल्याचे सांगून आघाडी ही संपूर्ण ठाण्यासाठी समान असेल, असे संकेत दिले होते. त्यानुसार काँग्रेसने हा फॉर्म्युला पुढे केला आहे. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीतदेखील याच फॉर्म्युल्यानुसार आघाडी झाली होती. त्यानंतर सत्तेत आल्यानंतर आणि सत्तेपासून दूर जरी गेले तरीदेखील आता तोच फॉर्म्युला पुढे आणण्यात येत असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. त्यानुसारच ७०-६० चा फॉर्म्युला पुढे आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार आघाडीची बैठक होणार असून संपूर्ण ठाणे शहरासाठीचा हा फॉर्म्युला असेल असेही काँग्रेसने स्पष्ट केले. त्यात कळवा, मुंब्य्राचाही समावेश पक्षाने केला आहे. परंतु,याच मुद्यावरुन राष्ट्रवादी वेगळी भूमिका घेणार आहे. >कळवा, मुंब्य्रात काँग्रेस करणार सपाबरोबर घरोबा!ठाणे महापालिका निवडणुकीत कळवा, मुंब्य्रासहआघाडी करावी असा आग्रह काँग्रेसने धरला असला तरी राष्ट्रवादी त्यास तयार नाही. यामुळे राष्ट्रवादीला चकवा देण्याचे काँग्रेसने ठरविले असून त्यांनी कळवा, मुंब्य्रासाठी सपाबरोबर बोलणी करण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे सपाला येथे किती जागा द्यायच्या आणि आपण स्वत: किती जागांवर लढायचे हा फॉर्म्युला पण तयार केला आहे. निवडणूक जवळ आल्याने आता तिची रंगत आणखीनच वाढू लागली आहे. आघाडी होणार की नाही? तसेच युतीबाबत अनेक तर्कविर्तकावरुन सध्या ठाण्याचे राजकारण ढवळून निघत आहे. अशातच काँग्रेस, राष्ट्रवादीने आघाडी करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार या संदर्भातील चार बैठकाही पार पडल्या आहेत. या बैठकीत शहरातील जागा वाटपाच्या मुद्यावरुन एकमत झाले असून कळवा, मुंब्य्राबाबत मात्र ते झालेले नाही. नारायण राणे यांनी मात्र आघाडी करायची तर, कळवा, मुंब्य्रासकट झाली पाहिजे असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता आघाडीत बिब्बा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन समाजवादी पक्षाबरोबर अनोख्या आघाडीची तयारी काँगे्रसने कळवा, मुंब्रासाठी सुरु केली आहे. सपाचा विचार केल्यास २०१२ पूर्वी त्यांच्या पक्षाचे सुमारे पाच नगरसेवक सत्तेत होते. परंतु, २०१२ च्या निवडणुकीत हे सर्वच नगरसेवक राष्ट्रवादीत डेरेदाखल झाले. त्यामुळे सपा या भागात केवळ नावापुरती सिमीत राहीली. दरम्यान आता पुन्हा ठाणे महापालिका निवडणुकीत त्यांनी आपला नंबर लावण्यासाठी कंबर कसली आहे. परंतु, त्यांना कुणाच्या तरी कुबड्यांची आवश्यकता असल्याने त्यांनी काँग्रेसपुढे दोस्तीचा हात पुढे केला आहे. काँग्रेसनेदेखील त्यानुसार चर्चेची तयारी दाखवून सपाला या ठिकाणी चार जागा सोडण्यास संमती दिल्याची जोरदार चर्चा आता सुरु आहे. विशेष म्हणजे सपानेदेखील ही अट मान्य केल्याची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी कळवा, मुंब्य्रात बिनसल्यास सपाबरोबर आघाडी करुन राष्ट्रवादीला येथे काटें की टक्कर देण्यासाठी काँग्रेस सज्ज होत आहे. कळव्या, मुंब्य्राचे हे गणित पक्के झाल्यास ठाण्यातही राष्ट्रवादीने ज्या ज्या भागात पूर्ण पॅनल मागितले आहे, त्या जागांवर सपा बरोबर आघाडी करुन, राष्ट्रवादीला धक्का देण्याचा पावित्रा काँग्रसने घेतला आहे.