व्हेरायटी चौकात रास्ता रोको : स्कुटर रॅली काढून केला निषेध नागपूर : महागाईच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. पेट्रोल-डिझेल, रेल्वे प्रवास दरवाढीच्या निषेधार्ह नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे रविवारी स्कुटर रॅली काढून दरवाढीकडे लक्ष वेधले. दरम्यान व्हेरायटी चौकात कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केल्याने काही वेळ वाहतूक खोळंबली होती. महागाई कमी करण्याचा दावा करणारे भाजपाचे मोदी सरकार सत्तेवर येताच जीवनावश्यक वस्तुंचे भाव आकाशाला भिडले आहे. पेट्रोल डिझेल, रेल्वे प्रवास आदींमुळे सर्वसामान्य जनतेचे जीवन असह्य झालेले आहे. या भाववाढीच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार शहर काँग्रेस कमिटीतर्फे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात रविवारी सकाळी कस्तूरचंद पार्क येथून स्कुटर रॅली काढण्यात आली. पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांना आपली वाहने चालविणे कठीण झाले आहेत, याचे प्रतीक म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुचाकी वाहने हाताने व्हेरायटी चौकापर्यंत ओढत नेली. या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत कार्यकर्ते व्हेरायटी चौकात पोहोचताच अधिक आक्रमक झाले. त्यांनी ‘रास्ता रोको’ केला. स्टार बस रोखून धरल्या. त्यामुळे काही वेळ वाहतूक खोळंबली होती. नारेबाजी आणि शासन विरोधी घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. यानंतर महात्मा गांधीजींना अभिवादन करण्यात आले. विकास ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत सामान्यजनांच्या प्रश्नांना घेऊन आणखी तीव्र आंदोलनासाठी तयार राहण्याचे आवाहन केले. या रॅलीमध्ये आ. दीनानाथ पडोळे, नगरसेवक प्रशांत धवड, ईश्वर बरडे, अरुण डवरे, घनश्याम मांगे, डॉ. गजानन हटेवार, राजेश नगरकर, तन्वीर अहमद, कांता पराते, नयना झाडे, बंडुपंत टेंभुर्णे, नरेश खडसे, अशोक येवले, सुभाष भोयर, संजय मेश्राम, दिनेश वाघमारे, आदींनी शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)दत्ता मेघे यांच्याविरुद्ध आंदोलन करणार काँग्रेसच्या भरवशावर अनेक नेते मोठे झाले. दत्ता मेघे सुद्धा त्यापैकीच एक आहेत. काँग्रेसमध्ये राहून त्यांनी शाळा कॉलेज तयार केले. परंतु पक्षाच्या पडत्या काळात सोडून जात आहेत. इतकेच नव्हे तर काँग्रेसला संपविण्याची भाषा करीत आहेत. तेव्हा त्यांना अद्दल घडविण्यासाठी त्यांच्याविरुद्ध लवकरच आंदोलन पुकारण्यात येईल, अशी घोषणा शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी यावेळी केली.
महागाईविरुद्ध काँग्रेस रस्त्यावर
By admin | Published: July 07, 2014 1:11 AM