पुणे - केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या सरकारला सर्वसामान्य जनतेशी काही देणे घेणे राहिलेले नाही. मोदी सरकारकडून दररोज इंधन दरवाढ करून सर्वसामान्यांची लूट केली जात आहे. लोकांच्या कष्टाच्या कमाईची लूट करणा-या मोदी सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
यावेळी केंद्र सरकारचा समाचार घेत थोरात म्हणाले की, पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यातेलासह सर्व जिवनावश्यक वस्तुंचे दर गगनाला भिडले आहेत. पण त्यावर भाजपा गप्प बसून आहे. २०१४ पूर्वी केंद्रात काँग्रेसप्रणित युपीएचे सरकार असताना महागाईच्या विरोधात आंदोलन करणारे भाजपचे नेते आता कुठे लपले आहेत? भाजपाचे सरकार आल्यास ४० रुपये लिटर पेट्रोल देऊ, १०० दिवसात महागाई कमी करू अशा घोषणा भाजपा नेते करत होते पण सत्तेत येऊन ७ वर्ष झाली तरी केंद्रातील भाजपा सरकारने काहीच केले नाही. उलट ७० रुपये लिटरचे पेट्रोल ११५ रुपये व डिझेल १०० रुपयांच्या वर गेले आहे. युपीएचे सरकार असताना एलपीजी सिलिंडर ३५० रुपयांना येत होता आता तो १००० रुपये झाला तरी भारतीय जनता पक्षाचे नेते बोलत नाही. या नेत्यांना जनता जाब विचारल्याशिवाय राहाणार नाही. जनतेच्या मनात महागाईबद्दल असंतोष असून त्याचा कधीही उद्रेक होईल.
माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली उस्माबाद जिल्ह्यातील उमरगा येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाढत्या महागाईविरोधात आंदोलन करत मोदी सरकारचा निषेध केला. चंद्रपूर, सिंधुदुर्ग, धुळे शहर, नाशिक शहर, लातूरसह राजाच्या इतर भागातही महागाईमुक्त भारत आंदोलन करत केंद्र सरकारच्या विरोधात घोषाबाजी करण्यात आली. महागाईविरोधातील आंदोलन हे विविध कार्यक्रमासह आठवडाभर राबविले जाणार आहे.
इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात काँग्रेस पक्षातर्फे देशव्यापी महागाईमुक्त भारत अभियान राबवून आंदोलन करण्यात येत आहे. आज पुणे काँग्रेसच्या वतीने महसूल मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथील अलका चौकात महागाईची गुढी उभारून, घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. आमदार संग्राम थोपटे, शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, देवीदास भन्साळी, सरचिटणीस अभय छाजेड, दीप्ती चवधरी, रविंद्र धंगेकर, अरविंद शिंदे, कमलताई व्यवहारे, दत्ता बहिरट, वीरेंद्र किराड, अजित दरेकर, गोपाळ तिवारी, रमेश अय्यर, चंद्रशेखर कपोते, प्रशांत सुरसे, महिला काँग्रेस अध्यक्षा पूजा आनंद, सोनाली मारणे, स्वाती शिंदे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.