मुंबई - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतरही सरकार इंधनावर कराचा बोझा टाकून महागाई वाढवत आहे. सध्या संपूर्ण दक्षिण आशियात सर्वांत महाग पेट्रोल, डिझेल भारतात आहे. निरव मोदी, विजय माल्ल्याने बँकांच्या बुडवलेल्या हजारो कोटी रुपयांची वसुली सर्वसामान्यांकडून करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज केली. तर इंधन दरवाढीविरुद्ध राज्यव्यापी आंदोलनाची घोषणाही त्यांनी या वेळी केली.पेट्रोल, डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी करून येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी आरोप केला की, राज्य सरकारनेही पेट्रोल, डिझेलवर विविध कर आणि सेस लावले आहेत. त्यामुळे गोवा, कर्नाटक या शेजारील राज्यांपेक्षा महाराष्ट्रात इंधनाचे दर खूप जास्त आहेत. या दरवाढीमुळे महागाईचा भडका उडणार असून, सर्वसामान्यांना याचा मोठा आर्थिक त्रास सहन करावा लागणार आहे. महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे. सरकारने पेट्रोल, डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणून तत्काळ इंधनाच्या किमती कमी करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्ते राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन करणार आहेत, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून सातत्याने सर्वसामान्य दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. फेक न्यूजसंदर्भात सोमवारी माहिती व प्रसारण खात्याने काढलेले पत्रक हा माध्यमांचा आणि पत्रकारांचा आवाज दडपण्याच्या सरकारी प्रयत्नांचा भाग आहे. सर्व माध्यमांनी व पत्रकारांनी सरकारवर टीका न करता फक्त सरकारची भलामण करावी असा सरकारचा प्रयत्न आहे. ही अघोषित आणीबाणी असून, देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू झाली आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली.
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस करणार आंदोलन - अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 5:05 AM