महाआघाडीत काँग्रेसला नको मनसेची साथ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 09:01 AM2018-10-01T09:01:42+5:302018-10-01T09:02:03+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधातील महाआघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या समावेशावरून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणातणी सुरू झाली आहे.
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधातील महाआघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या समावेशावरून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणातणी सुरू झाली आहे. महाआघाडीत मनसेला सामील करून घेण्याची भूमिका राष्ट्रवादीने मांडली आहे, तर उत्तर भारतीयांची मते गमाविण्याच्या भीतीपोटी काँग्रेसने मनसेला विरोध केला आहे.
मुंबई, पुणे आणि नाशिकसह राज्यातील विविध भागांत विशेषत: शहरी पट्ट्यात राज ठाकरे यांना मानणारा वर्ग आहे. या मतदाराला आपल्याकडे वळविण्यासाठी मनसेला महाआघाडीत सामील करून घेण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीने काँग्रेसला दिला होता. काँग्रेसने मात्र या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला आहे. मनसेला सोबत घेण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रस्ताव आला आहे. मात्र, मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेसचा केंद्र आणि राज्यस्तरावर विरोध असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी स्पष्ट केले आहे. मनसे महाआघाडीचा भाग नसेल. मनसे आणि आमची विचारधारा जुळत नाही. मनसे कायद्याचे पालन करत नाही, हिंसेचे राजकारण करतात. २०१४ मध्ये राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता, आताही त्यांनी मोदींनाच पाठिंबा द्यावा.
भाजपाचे आणि मनसेचे जवळचे संबंध असल्याचा आरोपही निरुपम यांनी केला. उत्तर भारतीय मतदारांमध्ये राज ठाकरे यांची प्रतिमा खलनायकापेक्षा कमी नाही. उत्तर भारतीय हे काँग्रेसचे परंपरागत मतदार आहेत. गेल्या निवडणुकीत हे मतदार भाजपासोबत गेले होते. या वेळी ते पुन्हा काँग्रेससोबत येण्याची शक्यता आहे. अशा वेळी राज ठाकरे यांना सोबत घेतल्यास उत्तर भारतीय मतदार पुन्हा नाराज होतील आणि याचा फायदा भाजपालाच होईल, असेही संजय निरुपम म्हणाले.
मुंबईत काही दिवसांपूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादीची आगामी निवडणुकीसंदर्भात बैठक पार पाडली. या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांनी समर्थन दिले होते. शिवडी, दादरसारख्या राज्यातील किमान २५ विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अस्तित्व नाही, अशा जागा मनसेला सोडून शहरी भागातील राज ठाकरेंची मते आघाडीकडे वळविता येऊ शकतात. यात आघाडीचाच फायदा होईल, अशी भूमिका राष्ट्रवादीने मांडली. काँग्रेसने उत्तर भारतीय मतांचा मुद्दा पुढे केला असला, तरी त्यात काही दम नाही. उत्तर भारतीय मते काँग्रेसकडे वळतील, अशी चिन्हे सध्या दिसत नसल्याची भूमिकाही राष्ट्रवादीने मांडली होती. काँग्रेसने मात्र मनसेच्या समावेशाला तीव्र विरोध दर्शविला आहे.
>निर्णय राज ठाकरे हेच घेतील - मनसे
निवडणुकीसाठी आघाडी करायची का, करायची असेल तर कोणासोबत करायची, याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेच निर्णय घेतील, अशी सावध प्रतिक्रिया मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी महाआघाडीबाबत बोलताना दिली.