चीनच्या मुद्यावर काँग्रेस एकाकी? काँग्रेसपासून शरद पवारांनी अंतर राखले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 11:56 PM2020-06-27T23:56:27+5:302020-06-28T08:19:55+5:30

साताऱ्यात म्हणाले । चीनने १९६२ च्या युद्धानंतर ४५ हजार चौरस कि.मी. भूभाग बळकावला

Congress alone on China issue? Sharad Pawar kept his distance from the Congress | चीनच्या मुद्यावर काँग्रेस एकाकी? काँग्रेसपासून शरद पवारांनी अंतर राखले

चीनच्या मुद्यावर काँग्रेस एकाकी? काँग्रेसपासून शरद पवारांनी अंतर राखले

Next

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : चीनच्या मुद्यावरून मोदी सरकारवर हल्ले होत असताना माजी संरक्षणमंत्री आणि काँग्रेसचा सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी स्वत:ला यापासून दूर ठेवले आहे.

सातारा येथे बोलताना शरद पवार म्हणाले की, चीनने १९६२ च्या युद्धानंतर जवळपास ४५ हजार चौरस कि.मी. भारतीय भूभाग बळकावला आहे. दरम्यान, पीएमओने २० जून रोजी स्पष्ट केले होते की, गत ६० वर्षांत देशाने ४३ हजार चौरस कि.मी. भाग गमावला आहे. मात्र, मोदी सरकारच्या काळात एक इंचही जमीन गमावली नाही. शरद पवार हे जाहीरपणे काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते राहुल गांधी यांच्यासह सर्वांना सांगत आहेत की, हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेचा आहे आणि याचे राजकारण करू नका. त्यांनी हे स्पष्ट केले की, चीनने आपला ४५ हजार चौरस कि.मी. भूभाग बळकावला आहे, हे कोणीही विसरू शकत नाही. शरद पवार यांचे असेही म्हणणे आहे की, गलवान खोऱ्यातील घटना ही संरक्षण मंत्रालयाचे अपयश आहे, अशा स्वरूपात लगेच पाहता येणार नाही. कारण, गस्तीवरील भारतीय सैनिक सतर्क होेते.

चीनच्या मुद्यावर काँग्रेस एकाकी?
चीनच्या मुद्यावर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेपासून स्वत:ला दूर ठेवण्याची शरद पवार यांची ही चौथी वेळ आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सर्वपक्षीय बैठकीत शरद पवार यांनी काँग्रेसच्या भूमिकेपासून स्वत:ला दूर ठेवले. सरकारने विरोधी पक्षांची समोरासमोर बैठक घ्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली होती. त्यावेळीही पवार यांनी वेगळी भूमिका घेतली होती. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी चीनच्या मुद्यावर काँग्रेसच्या भूमिकेवर असहमती दर्शविली होती. चीनच्या मुद्यावर काँग्रेस काही प्रमाणात एकाकी पडल्याचे दिसत आहे. कारण, कोणताही प्रमुख विरोधी पक्ष त्यांना समर्थन करताना दिसत नाही. अगदी डावे पक्ष, डीएमके, जेएमएम, ममता बॅनर्जी, सपा, बसपा, टीडीपी, वायएसआर काँग्रेस, टीआरएस, बेजेडी हे पक्षही थेट बोलत नाहीत. कारण, सीमेवर युद्धासारखी परिस्थिती आहे.

Web Title: Congress alone on China issue? Sharad Pawar kept his distance from the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.