“शिंदे गट-अजित पवार गट संपवणे हाच भाजपाचा कट, महायुतीला ९ जागा मिळतील”; काँग्रेसचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 11:46 AM2024-04-18T11:46:15+5:302024-04-18T11:48:07+5:30
Congress Ashish Deshmukh News: आमच्या हाती एक सर्व्हे आला आहे. त्यानुसार राज्यात महाविकास आघाडीला ३९ तर महायुतीला अवघ्या ९ जागा मिळतील असे चित्र आहे, असा दावा करण्यात आला आहे.
Congress Ashish Deshmukh News: काही जागांवरून महायुतीत असलेला तिढा आता हळूहळू सुटताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत साताऱ्यानंतर आता रत्नागिरी-सिंधुदुर्गाची जागा भाजपाकडे आली आहे. भाजपाने या जागेवर नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या एका नेत्याने महायुतीला ९ जागा मिळतील. तसेच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला संपवणे हाच भाजपाचा कट असल्याचा दावा केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो असे म्हटले होते. शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांना बरोबर घेत भाजपाची सत्ता स्थापन झाली. त्यानंतर वर्षभराने अजित पवार महायुतीत सहभागी झाले. असे असले तरीही लोकसभेच्या जागावाटपावरुन शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट नाराज असल्याची चर्चा आहे. यावरून काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी भाजपावर टीका केली.
शिंदे गट-अजित पवार गट संपवणे हाच भाजपाचा कट
जी काही फोडाफोडी झाली त्यावरुन सुरुवातीला असे वाटत होते की, भाजपाला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना राजकीयदृष्ट्या संपवायचे आहे. मात्र महायुतीत जे काही चालले आहे, त्यावरुन भाजपाचा खरा कट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात असल्याचेच वाटते आहे. निवडणूक आयोगाने ज्यांना मूळ पक्ष म्हणून मान्यता दिली ते कमी जागा लढवत आहेत. जे पक्ष खोटे ठरवले आहेत, ते जास्त जागा लढवत आहेत. आमच्या हाती एक सर्व्हे आला आहे. त्यानुसार राज्यात महाविकास आघाडीला ३९ तर महायुतीला अवघ्या ९ जागा मिळतील असे चित्र आहे, असा दावा अमित देशमुख यांनी केला.
दरम्यान, महाराष्ट्रात महायुतीत कोण कोणत्या पक्षात आहे? कोण कुणाचा अर्ज भरणार आहे, कोण कुणाचा प्रचार करणार? कुणाच्या तिकिटावर कोण उभे राहणार? काहीही कळायला मार्ग नाही. भाजपाने फोडाफोडी केली. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात भाजपाने फोडाफोडी केली. महाराष्ट्रातली आजची परिस्थिती फारच दयनीय आहे, अशी टीका अमित देशमुखांनी केली.