Congress Amit Deshmukh News:काँग्रेस विधिमंडळ पक्षाची मुंबईत एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला अनेक आमदार उपस्थित नव्हते. यापैकी एक नाव म्हणजे अमित देशमुख.अमित देशमुख यांच्या अनुपस्थितीवरून अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. यावर अमित देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशावरही भाष्य केले आहे.
खूपच आधी एक पूर्वनियोजित कार्यक्रम ठरलेला होता. माझ्या प्रमुख उपस्थितीत तो कार्यक्रम होणार होता. त्यामुळे त्या कार्यक्रमाला जाणे माझ्यासाठी अनिवार्य होते. विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची परवानगी घेऊन अनुपस्थित राहिलो होतो. तसेच अन्य कार्यक्रमांची लगबग आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना वाव मिळाला असू शकतो, असे अमित देशमुख यांनी स्पष्ट केले.
अशोक चव्हाण जायला नको होते, पण...
हा निर्णय वैयक्तिक होता, असे अशोक चव्हाण यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता त्याच्या खोलात आपण जाऊ शकत नाही. त्या मागे काय कारणे होती, काय पार्श्वभूमी होती. अशोक चव्हाण यांच्या जाण्याचा काँग्रेस पक्षावर काही परिणाम होणार नाही. मात्र, अशोक चव्हाण पक्ष सोडून गेले, याचे आम्हाला दुःख आहे. ते जायला नको होते. आमचे संबंध कौटुंबिक सुरुवातीपासून आहेत. महाराष्ट्र काँग्रेस एक कुटुंब म्हणून आम्ही काम करत होतो. ते गेले म्हणून इतरही लोक जातील, असे मानण्याचे कारण नाही. मीही कुठे जात नाही. काँग्रेसमध्येच आहे, असे अमित देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी १२ फेब्रुवारीला काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. तर १३ फेब्रुवारीला त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाने १४ फेब्रुवारी रोजी त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आणि १५ फेब्रुवारीला त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपाने महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, डॉ. अजित गोपछडे आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवायचा निर्णय घेतला.