ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 28 - सध्याच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं एकत्र येणं सामाजिक ऐक्याच्या दृष्टीनं हिताचं आहे, पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेसला संपवण्याची भाषा करताहेत, पण राजकीय विचार कधीचं संपत नसतो अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये केली.
शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर ते पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये 2 दिवसांच्या दौऱ्यावर होते. या निमित्तानं आज कोल्हापूर महापालिका आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे.
त्यात राष्ट्रवादीनं अनेक ठिकाणी भाजपसोबत युती केली आहे म्हणून पवारांचे काँग्रेसबाबतचे वक्तव्य कार्यकर्त्यांसाठीच होते का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली. राज्य स्तरावरही राष्ट्रवादीची भाजपशी छुपी युती असल्याची चर्चा आहे पण देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये अनेक काँग्रेसजनांनी त्याग केला आहे त्यामुळं काँग्रेसला संपवता येणार नाही असेही पवार यांनी सांगितले.. यावेळी माजी मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.