माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 07:04 PM2024-10-17T19:04:54+5:302024-10-17T19:07:16+5:30
लोकसभा निवडणुकीवेळी कोल्हापूरात छत्रपती संभाजीराजे यांनी काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांचा प्रचार केला होता, मात्र विधानसभेला ते महाशक्ती आघाडीचा घटक बनले आहेत.
पुणे - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आणि मविआ यांच्यासोबत परिवर्तन महाशक्ती नावाची तिसरी आघाडी रिंगणात उतरली आहे. या आघाडीत बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह स्वराज्य पक्षाचे प्रमुख युवराज संभाजीराजे छत्रपती यांचाही समावेश आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत संभाजीराजे यांनी कोल्हापूरातमहाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केला मग विधानसभेला मविआविरोधात का असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. त्यावर संभाजीराजे यांनी पुण्याच्या पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
माजी खासदार छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीवेळी काँग्रेस आणि स्वराज्य आघाडी होणार होती आणि कोल्हापूरची जागा स्वराज्य पक्षाला देणार असा शब्द काँग्रेस हायकमांडनं दिला होता, पण काही कारणास्तव छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी पुढे आली तेव्हा माझ्यासमोरील सर्व प्रश्न, विषय फुलस्टॉप झाले. शाहू महाराजांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. त्यानंतर मुलाची जबाबदारी मी निवडणुकीत पूर्णपणे पार पाडली आहे. ज्यादिवशी शाहू महाराज निवडून आले त्याच दिवशी माझा महाविकास आघाडीचा विषय संपलेला आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच मी महाविकास आघाडीच्या कार्यक्रमाला, सत्काराला मी गेलोय का हे मला सांगा, शाहू महाराज निवडून आल्यानंतर कोल्हापूरात त्यांचे सत्कार झाले मग तेव्हा बंटी पाटील आणि काँग्रेसनं मला सत्काराच्या कार्यक्रमात का बोलावले नाही. सगळ्यात जास्त मी निवडणुकीत राबलो होतो. त्यावेळी हा प्रश्न कुणी केला नाही. माझेही स्वातंत्र्य आहे. शिवाजी महाराज, शाहू-फुले आंबेडकरांचा विचार घेऊन मी पुढे जातोय. त्यामुळे कोल्हापूर कनेक्शन आणि तिसरी आघाडी विषय जुळत नाही असं संभाजीराजेंनी म्हटलं.
दरम्यान, आम्हालाही काम करायचे स्वातंत्र्य आहे, हायकमांडच्या आदेशात काम करायला मला जमत नाही. त्यापेक्षा आमचं वेगळं स्वराज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मूठभर मावळे घेऊन स्वराज्य स्थापन केले, तसं मूठभर कार्यकर्ते घेऊन आम्हाला काहीतरी धाडस करायचं आहे. २००९ नंतर मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर गेलो नाही. जे आलोय ते स्वराज्य पक्षाच्या व्यासपीठावर आहे. माझी राजकीय चळवळ ही वेगळी आहे असंही छत्रपती संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.