मुंबई - लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात युती होणार असल्याचे बोलले जात असताना ऐनवेळी जागावाटपावरून ही युती होऊ शकली नव्हती. मात्र लोकसभेत वंचित आघाडी आणि काँग्रेस यांच्यातील युती न होण्याचे मुख्य कारण आता समोर आले आहे. बारामती व नांदेड हे दोन मतदारसंघ प्रकाश आंबेडकर यांना हवे होते, मात्र ह्या जागा देण्यासा काँग्रेस-राष्ट्रवादी तयार न झाल्याने अखेर ही युती फिसकटली असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे संसदीय बोर्डचे सदस्य अण्णाराव पाटील यांनी केला आहे. ते एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
लोकसभा निवडणुकीवेळी महाआघाडीत प्रकाश आंबडेकर यांची वंचित बहुजन आघाडी सामील होणार असल्याचे बोलले जात होते. सुरवातीला प्रकाश आंबेडकर यांनी १२ जागांची मागणी केली होती. मात्र काँग्रेसला हे मान्य नव्हते. तरीही दोन्हीकडून प्रयत्न सुरु होते. त्याचवेळी प्रकाश आंबडेकर यांनी आपली 22 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यांनतर आंबेडकर यांनी उमेदवारी जाहीर झाली असल्याने युतीसाठी ती माघे घेता येणार नसल्याचे सांगितले होते. पण तरीही आमचा प्रस्ताव मान्य असेल तर काँग्रेसने आम्ही जाहीर केलेल्या उमेदवारांना एबी.अर्ज द्यावा असेही आंबेडकर म्हणाले होते. मात्र पुढे काँग्रेसकडून कोणतेही प्रतिकिया आली नसल्याने आंबेडकर यांनी आपले उरलेले उमेदवार जाहीर केले होते.
लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबडेकर आणि काँग्रेस यांच्यात युती न होण्याचे मुख्य कारण बारामती आणि नांदेडचा मतदारसंघ असल्याचे आता समोर आले आहे. अण्णाराव पाटील यांनी याचा खुलासा केला आहे. लोकसभा निवडणुकीत आंबेडकर यांनी या दोन्ही ठिकाणची उमेदवारी आधीच जाहीर केली होती. त्यामुळे ह्या जागा तुंम्हाला सोडता येणार नसल्याची भूमिका आंबडेकर यांनी घेतली होती. मात्र हे काँग्रेस-राष्ट्रवादिला मान्य नव्हते. त्यामुळेच पुढे युती होऊ शकली नसल्याचे अण्णाराव पाटील यावेळी म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत सुद्धा बारामतीमधून राष्ट्रवादी अजित पवार यांना उमेदवारी देणार आहेत. मात्र ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत अशा व्यक्तींना उमेदवारी देणाऱ्या पक्षासोबत कसे जायचं असा प्रश्न यावेळी अण्णाराव पाटील यांनी उपस्थितीत केला. त्यामुळे लोकसभाप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत सुद्धा बारामतीची जागा आघाडी आणि वंचितमधील युती न होण्याचे कारण ठरू शकते अशी चर्चा पाटील यांच्या वक्तव्यानंतर पाहायला मिळत आहे.