लोकमत न्यूज नेटवर्क, अकाेला : जागा वाटपाबाबत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र बसून ताेडगा काढत ४८ लाेकसभा जागांचा निर्णय करावा, असे पत्र वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पाठविले आहे. याबाबत ‘वंचित’चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. दरम्यान, अंतिमक्षणापर्यंत आम्ही आघाडीच्या प्रतीक्षेत आहाेत; परंतु तिढा सुटलाच नाही तर आम्हाला भूमिका स्पष्ट करावी लागेल, असेही ते म्हणाले.
काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात किमान १५ जागांवर एकमताचा अभाव आहे, यामुळे जागावाटपाचे समीकरण निश्चित करण्यासाठी वेळ लागत असल्याचे प्रमुख कारण समाेर येत असल्याचे पत्रातून खरगे यांना कळविण्यात आले आहे. या अनुषंगाने ९ मार्चला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यासाेबत संपर्क साधून जागावाटपाबाबतच्या विलंबाबाबत अवगत केले आहे.