Kasba Bypoll Election Result 2023: महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय झाला. कसब्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा पराभव केला. तब्बल ३० वर्षांनी भाजपचा कसब्यात पराभव झाला. यावरुन आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून, महाविकास आघाडीचे नेते भाजपवर टीका करत आहेत. यातच आता पुण्यातील कसबा मतदारसंघात जे झाले, तेच नागपूरमध्ये होईल. देवेंद्र फडणवीस यांचा पराभव शक्य आहे, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी हा दावा केला आहे. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उभे होते. कसबा आणि चिंचवड निकालावर बोलताना आशिष देशमुख म्हणाले की, कसबा आणि दक्षिण पश्चिम नागपूर या दोन्ही मतदारसंघाची राजकीय, भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीत सारखीच आहे. दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये महाविकास आघाडीची एकी असल्यास देवेंद्र फडणवीस यांचा पराभव शक्य असल्याचा दावा आशिष देशमुख यांनी केला आहे.
मतदार माझ्या पाठीशी उभे राहिले होते
कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या पाठीशी मतदार उभे राहिले. त्याच पद्धतीने दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये २०१९ मध्ये अगदी कमी कालावधीतही मतदार माझ्या पाठीशी उभे राहिले होते, असे आशिष देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री असताना आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतानाही २०१४ च्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांचे मताधिक्य कमी करु शकलो, असे आशिष देशमुख म्हणाले. तसेच ज्या पद्धतीने नागपुरात शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ आणि इतर निवडणुकांमध्ये सातत्याने काँग्रेसचा महविकास आघाडीचा विजय होत आहे. त्याच ताकदीने एकत्रितपणे लढल्यावर पुढील निवडणुकीत नागपूरच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघातही महाविकास आघाडीचा विजय निश्चित होईल. कुठलाही उमेदवार दिला तरी तो निवडून येईल, असा दावा आशिष देशमुख यांनी केला.
दरम्यान, कसबा पेठ या भाजपाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या मतदारसंघातून भाजप उमेदवार निवडून येत असे पण यावेळी कसबा पेठच्या जनतेने भाजपाचा डाव उधळून लावला. पुणे हे शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराचे शहर असून, जनतेने मतपेटीतून भाजपला जागा दाखवून दिली, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम