“देशात विदर्भासह ७५ वेगळी राज्य करा”; काँग्रेसचे मोदींना पत्र? प्रशांत किशोरही ॲक्टिव्ह!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 04:30 PM2022-07-14T16:30:45+5:302022-07-14T16:33:03+5:30
प्रशांत किशोर यांच्या मदतीने स्वतंत्र विदर्भाची चळवळ अधिक प्रभावीपणे राबवण्याचे ठरवले आहे, असे सांगितले जात आहे.
नागपूर: राज्यात एकीकडे सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. यातच राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली असून, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही देशभरात सुरू आहे. मात्र, देशाची लोकसंख्या प्रचंड वाढली असून, राज्यांचे नियोजन अधिक योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी देशात देशात विदर्भासह ७५ वेगळी राज्य करा, अशा आशयाचे पत्र काँग्रेसकडून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे. तसेच स्वतंत्र विदर्भाची मागणी अधिक तीव्र करण्यासाठी रणनीतिकार प्रशांत किशोर सक्रीय होणार असल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. देश अमृत महोत्सवी वर्ष साजरे करतोय, पण वाढत्या लोकसंख्येची गणितं कशी जुळवणार? त्यासाठी राज्यांचीदेखील संख्या वाढवली पाहिजे. अमेरिका, स्वित्झर्लंडसारख्या देशांमध्ये लोकसंख्येनुसार राज्यांची रचना करण्यात आली आहे. त्यामुळेच तेथील राज्ये प्रगत आहेत. भारतात राज्यांची संख्या लोकसंख्येच्या गणितानुसार वाढवल्यास प्रत्येक राज्यावर जास्त लक्ष केंद्रित करून विकास करता येईल. आता संपूर्ण देशाची विभागणीच २९ ऐवजी ७५ राज्यांमध्ये करावी, असे आशिष देशमुख यांनी म्हटले आहे. यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिणार आहेत.
प्रशांत किशोर यांनीही केली कामाला सुरुवात!
स्वतंत्र विदर्भाची मागणी अनेक वर्षांपासून लावून धरण्यात आली आहे. मागणी अधिक तीव्र करण्यासाठी ज्येष्ठ रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी विनंतीला मान देऊन यासाठी काम सुरु केले आहे, अशी माहिती आशिष देशमुख यांनी दिली. स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली. लोकसंख्या वाढली आहे. १३० कोटी जनतेचा देश आणि २९च राज्य आहेत. म्हणून ७५ राज्य करावीत, अशी मागणी करतोय. महाराष्ट्र १९६० मध्ये स्थापन झाला. तेव्हा ३ कोटी लोकसंख्या होती. आता तीच लोकसंख्या १३ कोटींवर पोहोचली आहे. राज्य चांगली चालवायची असतील तर त्यांचे विभाजन होणे गरजेचे आहे. राज्यांचे सरकार लोकांसाठी प्रभावीपणे काम करणे अपेक्षित असेल तर आपल्या देशातील राज्य वाढली पाहिजेत. या सर्व मागण्यांसाठी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचे आशिष देशमुख यांनी सांगितले. ते टीव्ही९शी बोलत होते.
दरम्यान, रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी कित्येक राज्यांचा अभ्यास केला आहे. पंतप्रधान मोदी, ममता बॅनर्जी, जगनमोहन रेड्डी, तेलंगणाचे केसीआर, नितीश कुमार या सर्व लोकांच्या विजयात अत्यंत अभ्यासपूर्ण योगदान दिले आहे. आता ते स्वतंत्र विदर्भ राज्याच्या चळवळीत उतरण्यासाठी तयार झाले आहेत. आता त्यांच्या मदतीने स्वतंत्र विदर्भाची चळवळ आम्ही अधिक प्रभावीपणे राबवण्याचे ठरवले आहे. मला अपेक्षा आहे की, या चळवळीच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि भाजपला देशातील ३०वे राज्य लवकरच स्थापन करण्यासाठी बाध्य करू, असे आशिष देशमुख म्हणाले.