Ashok Chavan: मोदी आडनावावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरात न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल केली जाऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे काँग्रेसकडून स्वागत केले जात आहे. काँग्रेसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे म्हटले आहे. शेवटी सत्याचा विजय होतोच, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली.
राहुल गांधींनी लोकसभा अध्यक्षांना एक पत्र दिल्यानंतर त्यांना पुन्हा सदस्यत्व मिळणार आहे. आजचा निर्णय ही समाधानाची बाब आहे. क्षुल्लक गोष्टीवरुन सदस्यत्व रद्द करणे हा निर्णय लोकशाहीला मारक होता. परंतु कुठेतरी सत्याचा विजय होतोच, ते झाले. आता राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल होईल, यात संशय नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले.
सत्याचा विजय व हुकुमशाही वृत्तीला चपराक
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीचे काँग्रेस पक्ष स्वागत करत असून हा सत्याचा विजय आहे. देशात हुकुमशाही व मनमानी कारभार सुरु असून या शक्तींच्या विरोधात काँग्रेस न डगमगता उभी आहे. राहुल गांधी यांच्यावर खोट्या तक्रारीच्या माध्यमातून शिक्षा देण्याचे काम झाले होते पण देशात न्यायव्यवस्था जिवंत आहे. राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती हा सत्याचा विजय व हुकुमशाही वृत्तीला चपराक असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
दरम्यान, सत्यमेव जयते! कोणीही सत्याचा आवाज दाबू शकत नाही. राहुल गांधी यांच्याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय स्वागतार्ह आहे. देशात लोकशाही शिल्लक आहे, हे दिसून आले. चुकीच्या पद्धतीने दिलेल्या शिक्षेला स्थगिती मिळालेली आहे. राहुल गांधी तुमचे संसदेत स्वागत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.