नांदेड: मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढून काय निष्पन्न होणार, त्यापेक्षा ज्या ज्या पक्षाचे खासदार संसदेत आहेत, तिथे त्यांनी आवाज उठवला तर फायदा होईल, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.
१६ जून रोजी खासदार संभाजी महाराज यांच्या नेतृत्वात कोल्हापूरमध्ये काढण्यात येणाऱ्या मोर्चाबाबत विचारले असता, अशोक चव्हाणांनी ही प्रतिक्रीया दिली. मराठा आरक्षण व्हावे अशी सरकारचीही इच्छा आहे. त्यामुळे मोर्चा नेमका कोणाच्या विरोधात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आता सर्व अधिकार केंद्राचे आहेत. आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यांनी भूमिका घेतली तर, हा प्रश्न मार्गी लागू शकतो, असे चव्हाण म्हणाले. या प्रतिक्रियेमुळे आता मराठा आरक्षणाचा प्रश्न महाविकास आघाडीने पंतप्रधानांच्या कोर्टात टोलवल्याचे स्पष्ट होत आहे.