अहमदनगर : महाराष्ट्र दुष्काळात भरडला जात असताना सत्ताधाऱ्यांची भूमिका बेजबाबदार आहे. ललित मोदी तसेच मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळ्यात अडकलेल्या नेत्यांना सरकारकडून पाठीशी घातले जात आहे. सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांवर काँग्रेस हल्लाबोल करणार असून, प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करून जनतेच्या वस्तुस्थिती लक्षात आणून दिली जाईल, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शुक्रवारी येथे दिली.केंद्र व राज्य सरकारवर टीका करताना काँग्रेसच्या आंदोलनाची दिशा त्यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले, की ललित मोदी प्रकरणात केंद्रीय विदेश मंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे; तर मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळ्यात तेथील मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांचा सहभाग स्पष्ट झाला आहे. काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावरूनच संसदेचे कामकाज बंद पडले होते. मात्र आता उलट काँग्रेसलाच बदनाम करण्याचे काम सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी यावर सोयीस्कर मौन धारण केले आहे. हा एकप्रकारे संसदीय परंपरेचा अवमान आहे. जीएसटी व भूमिसंपादन प्रकरणी जनतेची दिशाभूल केली जात आहे. या कायद्यातील त्रुटी दूर केल्यास विधेयक मंजुरीसाठी काँग्रेस तयार होती. मात्र यासाठी सत्ताधारी तयार नाहीत. त्यामुळे आम्ही ही वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणार आहोत.दुष्काळाचा प्रश्नही राज्य सरकार चुकीच्या पद्धतीने हाताळत आहे. सरकारला त्याचे गांभीर्य नाही. जनावरांसाठी चारा-पाणी नाही, पिण्याचे पाणी नाही. परंतु महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पशुग्रामची केवळ घोषणाच केली. वाटल्यास त्यांनी योजनेस ‘खडसेग्राम’ नाव द्यावे, पण जनावरे वाचविण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)दुष्काळी परिस्थितीचे राजकारण कोणीही करणार नाही. मात्र सरकारला प्रश्नाचे गांभीर्यच नाही. सर्व पक्षांनी एकत्र येऊन दुष्काळाशी लढा देण्याची गरज आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधी पक्ष मात्र एकवटले आहेत, अशा शब्दांमध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मत व्यक्त केले आहे.
काँग्रेस करणार सरकारवर हल्लाबोल
By admin | Published: August 29, 2015 1:37 AM