मोदींचा अजब न्याय, गुजरातला कांदा निर्यातीस परवानगी, महाराष्ट्राने काय पाप केले? काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 07:11 PM2024-04-26T19:11:59+5:302024-04-26T19:13:51+5:30

Congress News: मोदींकडे जाऊन कांदा निर्यात बंदी उठवण्याची धमक शिंदे, फडणवीस आणि पवारांमध्ये नाही का, अशी विचारणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

congress atul londhe criticises bjp and mahayuti govt over central govt onion export permission from gujrat | मोदींचा अजब न्याय, गुजरातला कांदा निर्यातीस परवानगी, महाराष्ट्राने काय पाप केले? काँग्रेस

मोदींचा अजब न्याय, गुजरातला कांदा निर्यातीस परवानगी, महाराष्ट्राने काय पाप केले? काँग्रेस

Congress News: देशभरात विशेषत: महाराष्ट्रात कांदा निर्यातबंदी असताना केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीत गुजरातमधून २००० मेट्रिक पांढऱ्या टन कांद्याच्या निर्यातीस मंजुरी दिल्याने राज्यातील व्यापारी आणि शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे. राज्यात लाल आणि आता उन्हाळी कांदा देशभरातील बाजार समित्यांत कवडीमोल भावाने विकला जात आहे. असे असताना फक्त गुजरातमध्ये पिकणाऱ्या पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीस केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने २५ एप्रिल रोजी परवानगी दिली. यानुसार गुजरातचा २००० मेट्रिक टन कांदा एनसीएलच्या ऐवजी थेट निर्यातदारांच्या माध्यमातून निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे. यावरून काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली.

भाजपा सरकार हे शेतकरी विरोधी आहे याचा सातत्याने प्रत्यय येत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुरुवातीला चांगला भाव मिळाला, शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे पडत असताना मोदी सरकारने कांदा निर्यात बंदी केली व कांद्याचे भाव घसरले. कांदा निर्यातबंदी उठवावी, यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी मागणी करत आहेत परंतु महाराष्ट्राच्या व इतर राज्यातील शेतकऱ्यांकडे मोदी सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले व आता अचानक गुजरात राज्यातील कांदा निर्यातील परवानगी दिली आहे, अशी टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. 

नरेंद्र मोदी केवळ गुजरातचे पंतप्रधान

मीडियाशी बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नसून ते केवळ गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत. मोदी सरकार गुजरातला कांदा निर्यातीची परवानगी देत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे काय करत होते? मोदींकडे जाऊन कांदा निर्यात बंदी उठवण्याची धमक या नेत्यांमध्ये नाही का? असा सवाल उपस्थित करत कांदा उत्पादक शेतकरी मोदी सरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असा इशारा अतुल लोंढेंनी दिला.

दरम्यान, कांदा निर्यातबंदी करून मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला असून कांदा निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकरी करत असताना त्याकडे केंद्रातील मोदी सरकारने दुर्लक्ष केले. आता लोकसभा निवडणुका सुरु असताना मोदी सरकारने गुजरातमधील २ हजार मेट्रीक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. गुजरातला परवानगी देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेजारचा महाराष्ट्र का दिसला नाही. मोदी सरकारचा हा अजब न्याय असून गुजरातला कांदा निर्यातीस परवानगी देता मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय पाप केले आहे? असा सवाल लोंढेंनी केला.


 

Web Title: congress atul londhe criticises bjp and mahayuti govt over central govt onion export permission from gujrat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.