“गुणरत्न सदावर्तेंवर कारवाई करण्याची हिंमत गृहमंत्र्यांनी दाखवावी”; काँग्रेसचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 03:42 PM2023-09-29T15:42:24+5:302023-09-29T15:42:54+5:30

Maharashtra Politics: नेमके प्रकरण काय? जाणून घ्या...

congress atul londhe demands that state home minister devendra fadnavis should show courage to take action against gunaratna sadavarte | “गुणरत्न सदावर्तेंवर कारवाई करण्याची हिंमत गृहमंत्र्यांनी दाखवावी”; काँग्रेसचे आव्हान

“गुणरत्न सदावर्तेंवर कारवाई करण्याची हिंमत गृहमंत्र्यांनी दाखवावी”; काँग्रेसचे आव्हान

googlenewsNext

Maharashtra Politics: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा उदो उदो करण्याची प्रवृत्ती देशात बळावत चालली आहे. नथुराम गोडसे हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खुनी आहे हे जगजाहीर असताना त्याचे गुणगान गाण्याची हिंमत फक्त भारतीय जनता पक्षाचे सरकार असतानाच होते. गुणरत्न सदावर्ते नावाच्या एका विकृत इसमाने स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या वार्षिक अहवालावर नथुराम गोडसेचा फोटो छापून उदात्तीकरण केले आहे. या विकृत इसमाला तात्काळ बेड्या ठोकण्याची हिंमत गृहमंत्री फडणवीस यांनी दाखवावी, असे आव्हान प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिले आहे.

अतुल लोंढे पुढे म्हणाले की, गुणरत्ने सदावर्ते हा व्यवसायाने वकील असलेला इसम सातत्याने भडाकाऊ विधाने करत असतो, सामाजिक वातावरण गढूळ करण्याचे काम करतो. महात्मा गांधी यांच्याबद्दलही हा इसम गरळ ओकत असतो. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा फोटो स्टेट ट्रान्सपोर्ट को- ऑपरेटिव्ह बँकेच्या अहवालावर छापून महात्मा गांधी यांचा अपमान केला. “गांधी यांचा विचार आता शिल्लक राहिलेला नाही” असे म्हणत सदावर्ते याने नथुरामचे गुणगान गायले. सदावर्ते या इसमाच्या मागे कोणाची शक्ती आहे, त्याचा बोलविता धनी कोण आहे, हे महाराष्ट्राला माहिती आहे, अशी टीका अतुल लोंढे यांनी केली.

राष्ट्रपित्याचा अपमान काँग्रेस पक्ष सहन करणार

राष्ट्रपित्याचा अपमान काँग्रेस पक्ष सहन करणार नाही. जेव्हा जेव्हा भाजपचे सरकार असते तेव्हा तेव्हा नथुरामाच्या औलादी डोके वर काढत असतात. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदावर्तेवर कडक कारवाई करून महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे हे दाखवून द्यावे, अशी आग्रही मागणी अतुल लोंढे यांनी केली. 

दरम्यान, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावानेच भारताची जगात ओळख आहे, गांधींच्या नेतृत्वाखालीच भारताने बलाढ्य ब्रिटिशांना भारत सोडण्यास भाग पाडले, अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले हेच काही लोकांना व संघटनांना पचनी पडत नाही. महात्मा गांधी यांचा अपमान भारतीय जनता पक्ष, त्यांच्या सहकारी संस्था व त्यांच्याशी सलंग्न व्यक्ती सातत्याने करत असतात,  अशा प्रवृत्तींना धडा शिकवणे गरजेचे आहे. सरकार याची गंभीर दखल घेऊन कडक कारवाई करेल अशी अपेक्षा आहे, असे अतुल लोंढे यांनी म्हटले आहे. 

 

Web Title: congress atul londhe demands that state home minister devendra fadnavis should show courage to take action against gunaratna sadavarte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.