Maharashtra Politics: नरेंद्र मोदी हे हुकूमशाहीपद्धतीने काम करत असून देशात लोकशाही व्यवस्था, संविधान सर्व काही धाब्यावर बसवले आहे. सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई करुन तो आवाज दडपण्याचे काम केले जाते. बीबीसीच्या दिल्ली व मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचे छापे हे त्याचाच भाग आहे. बीबीसीने गुजरात दंगलीसंदर्भात एक डॉक्युमेंटरी प्रसारित केली होती, त्याचा राग धरूनच ही छापेमारी केली असून देशात अघोषीत आणीबाणी अल्याचेच हे द्योतक आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, जगात भारताला शरमेने मान खाली घालावयास लावणाऱ्या गुजरात दंगलीसंदर्भात बीबीसीने काही दिवसांपूर्वी एक डॉक्युमेंटरी प्रसारित केली होती. ही डॉक्युमेंटरी भारतात दाखवू नये यासाठी मोदी सरकारने तात्काळ त्यावर बंदी घातली. बंदी घातली असतानाही काही ठिकाणी ही डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली. बीबीसीच्या या डॉक्युमेंटरमुळेच मोदी सरकारचे पित्त खवळले व त्यांच्या आवडत्या अस्त्रातील आयकर विभागाचे छापे टाकून बीबीसीला गप्प करण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारच्या विरोधात बोलल्यास त्याच्यावर ईडी, सीबीआय अथवा आयकर विभागाच्या माध्यमातून कारवाई करून गप्प करण्याचा प्रयत्न केला जातो, अशी टीका करण्यात आली.
क्षुल्लक कारणावरून पत्रकारांना जेलमध्ये डांबण्यात आले
कोरोनाकाळात दैनिक भास्कर वर्तमानपत्राने मोदी सरकारच्या कारभाराचा पंचनामा केला होता. गंगा नदीत मृतदेह तरंगत असतानाच्या बातम्याही प्रकाशित केल्या होत्या. कोरोना काळात मोदी सरकारला उघडे पाडण्याचे काम दैनिक भास्करने केले आणि त्यानंतर काही दिवसातच दैनिक भास्करच्या कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे टाकण्यात आले. मोदी सरकारच्या विरोधात ज्यांनी बातम्या दाखवण्याचा प्रयत्न केला त्या संपादकाला घरी पाठवण्यात आल्याची अनेक उदाहरणे आहेत. क्षुल्लक कारणावरून पत्रकारांना जेलमध्ये डांबण्यात आले. लोकशाहीचा हा चौथा स्तंभही मोदी सरकारच्या दबावाखाली आहे. मोदी राज्यात प्रसार माध्यमांना स्वातंत्र्य आहे असे भाजपाचे काही वरिष्ठ नेते सांगत असतात पण त्यात तथ्य नसून घाबरलेल्या हुकूमशाहने बीबीसीचा आवाज बंद करण्यासाठीच आयकर विभागाचे छापे टाकले, असेही लोंढे म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"