“मणिपूर, ब्रिजभूषण सिंह व अदानींवरील PM मोदींचे मौन देशासाठी घातक”; काँग्रेसची सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 07:18 PM2023-07-12T19:18:25+5:302023-07-12T19:21:58+5:30

राहुल गांधींच्या भारत योडो यात्रेचे जगाने कौतुक केले पण भारतात त्यांच्यावर अन्याय करण्याचे काम झाले, अशी टीका करण्यात आली आहे.

congress balasaheb thorat criticized pm modi govt over manipur violence and adani group brij bhushan sharan singh case | “मणिपूर, ब्रिजभूषण सिंह व अदानींवरील PM मोदींचे मौन देशासाठी घातक”; काँग्रेसची सडकून टीका

“मणिपूर, ब्रिजभूषण सिंह व अदानींवरील PM मोदींचे मौन देशासाठी घातक”; काँग्रेसची सडकून टीका

googlenewsNext

Congress Balasaheb Thorat News: मौन सत्याग्रह आंदोलन हे राहुल गांधी यांच्या समर्थनासाठी आहे, राहुल गांधींवर ज्या पद्धतीने कारवाई केली त्या अन्यायी कारवाई विरोधात मौन सत्याग्रह आंदोलन आहे. राहुल गांधी असे काय बोलले होते की त्यांची खासदारही रद्द केली. काँग्रेसला न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे पण निरपेक्ष यंत्रणेवरही दबाव आहे की काय असे चित्र दिसत आहे, अशी टीका विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केली.

मुंबई काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मौन सत्याग्रह करण्यात आला. यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, देशाचे नाव जगात उज्वल करणाऱ्या खेळाडू मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा भाजपाचा खासदार ब्रिजभूषण शरणसिंह मोकाट फिरत आहे. एफआयरमध्ये त्याच्यावर गंभीर आरोप आहेत,अशा गुन्हेगाराला भाजपा पाठिशी घालत आहे, त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात भाजपा व पंतप्रधान मौन आहेत, मणिपूर जळत आहे, त्यावरही मौन आहे आणि अदानीच्या २० हजार कोटी रुपयांवरही मौन आहे, हे त्यांचे मौन देशासाठी मात्र घातक आहे, या शब्दांत बाळासाहेब थोरात यांनी हल्लाबोल केला.

राहुल गांधी यांच्या भारत योडो यात्रेचे जगाने कौतुक केले

राहुल गांधी यांच्या भारत योडो यात्रेचे जगाने कौतुक केले पण भारतात मात्र त्यांच्यावर अन्याय करण्याचे काम झाले आहे. न्यायालयाकडूनही न्याय न मिळणे दुर्दैवी आहे. काँग्रेस पक्ष ही लढाई लढत आहे, सर्वोच्च न्यायालयात दाद मागू आणि न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला. तसेच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना थोरात म्हणाले की, सरकार बनवण्यासाठी तिघे एकत्र आले हे खरे आहे पण त्यात एक मुख्यमंत्री, दुसरा माजी मुख्यमंत्री तर तिसरा मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असणारा असे तीघेजण आहेत, या तिघांचा एकत्र मेळ बसणे अवघड दिसत आहे. एक आमदार म्हणतो मी ११० टक्के मंत्री होणार व पालकमंत्रीही होणारच आणि दुसराच मंत्री होतो आता त्याने लोकांना तोंड कसे दाखवयाचे? असा टोला थोरात यांनी मारला. 

दरम्यान, काँग्रेसची लढाई सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आहे. मौनात मोठी ताकद आहे, महात्मा गांधी यांनी दिलेले अहिंसेचे हे मोठे अस्त्र आहे. सत्य, सद्भावना व अहिंसा यावर आम्ही बोलत आहोत तर भाजप मात्र सत्तेसाठी काहीही करत आहे. लोकांचे प्रश्न घेऊन आम्ही लढत आहोत पण भाजप,ईडी, सीबीआयचा गैरवापर करून सत्तेसाठी काहीही करत आहेत. काँग्रेस सत्यासाठी तर भाजपा सत्तेसाठी लढत आहे. लोकशाही व संवैधानिक मुल्ये टिकवण्यासाठी आमचा संघर्ष सुरु आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन हा लढा देत आहोत, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष आमदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

 

Web Title: congress balasaheb thorat criticized pm modi govt over manipur violence and adani group brij bhushan sharan singh case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.