Maharashtra Politics: कन्याकुमारी ते काश्मीर निघालेल्या भारत जोडो यात्रेचे (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्राच्या जनतेने जल्लोषात स्वागत केले असून, नांदेड जिल्ह्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील जनतेनेही आपुलकीने, आनंदाने स्वागत केले आहे. ही पदयात्रा पुढे मार्गक्रमण करत २० तारखेनंतर मध्य प्रदेशात प्रवेश करेल. पण राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी या पदयात्रेच्या माध्यमातून जो संदेश दिला आहे तो महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम आम्ही करणार आहोत असे विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते व भारत जोडो यात्रेचे समन्वयक बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सांगितले.
कळमनुरी येथे पत्रकारांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, ७ सप्टेंबरला कन्याकुमारी पासून सुरु झालेली पदयात्रा दोन महिन्यानंतर देगलूर मार्गे महाराष्ट्रात आली आणि मागील पाच दिवसात या पदयात्रेचे येथील जनतेने जल्लोषात स्वागत केले आहे. नांदेड नंतर हिंगोली जिल्ह्यातही पदयात्रेचे त्याच उत्साही वातावरणात स्वागत केले गेले, अशी माहिती थोरातांनी दिली.
ही पदयात्रा सर्वसामान्य जनतेच्या अंतःकरणाला भिडत आहे
तुळजाभवानीच्या महाद्वारची प्रतिकृती, गजराजांच्या साक्षीने हजारो लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. बंजारा समाजील भगिनी, तरुणांचा सहभाग मोठा दिसला. हिंगोली जिल्ह्यात आल्यानंतर स्व. राजीव सातव यांची आठवण येणे स्वाभाविक आहे ते असते तर आणखी मोठ्या प्रमाणात भारतयात्रींचे स्वागत झाले असते पण आजही येथील पदाधिकारी कार्यकर्ते व जनतेने स्वागतात काही कमी ठेवले नाही. लातूर, कोल्हापूर जिल्ह्यातूनही हजारो लोक पदयात्रेच्या स्वागताला आले होते.भारत जोडो यात्रेबद्दल सामान्य जनतेमध्ये उत्सुकता, कुतुहल आणि राहुलजी गांधी यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असल्याचे दिसते. महागाई, रोजगार, शेतकरी, कष्टकरी समाजाच्या प्रश्नांना पदयात्रेत हात घातला जात आहे. राहुलजी वंचित, पीडित, सामान्य जनतेच्या समस्या ऐकून घेत त्यांना आधार देत आहेत. ही पदयात्रा सर्वसामान्य जनतेच्या अंतःकरणाला भिडत आहे, असे थोरात म्हणाले.
दरम्यान, भारत जोडो यात्रेला शिवसेनेने पाठिंबा दिला व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पदयात्रेत सहभाग घेतल्याने त्यांच्यावर केली जात असलेली टीका अनावश्यक आहे. लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी शिवसेना भारत जोडो यात्रेत सहभागी होत असेल तर स्वागतार्ह आहे. लोकशाही व संविधान वाचवणे भाजपाला मान्य नाही का? असा सवाला विचारून स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी त्या- त्या वेळची राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घेतलेले आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार प्रणव मुखर्जी, प्रतिभाताई पाटील यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता हे भाजपला माहित नाही का? प्रबोधनकार ठाकरे व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल भाजपने माहिती घ्यावी व नंतर बोलावे असा टोलाही थोरात यांनी लगावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"