Maharashtra Politics: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा गौप्यस्फोट केल्यानंतर यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती, असा मोठा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. यानंतर महाविकास आघाडीचे नेत्यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. यातच आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही यावर भाष्य केले आहे.
मीडियाशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, पहाटेचा शपथविधी शरद पवार यांना विचारून झालेला नव्हता असे माझे मत आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणेज ते शरद पवार आहेत. पहाटेचा शपथविधी शरद पवार यांना विचारून झाला असता तर ते सरकार पडलेच नसते. पहाटेचा शपथविधी शरद पवार यांना विचारून झालेला नाही, या मताचा मी आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टपणे सांगितले.
विकासाच्या मुद्द्याकडे लक्ष केंद्रीत करण्याऐवजी वेगळे वाद निर्माण करायचे
काहीतरी वाद निर्माण करण्याचे काम केले जात आहे. त्यांच्याकडे बोलण्यासाठी दुसरे काहीही नाही. विकासाच्या मुद्द्याकडे लक्ष केंद्रीत करण्याऐवजी वेगळे वाद निर्माण करायचे, हे भाजपच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. भाजपकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका थोरात यांनी केली.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे सहा महत्त्वाच्या पदांची जबाबदारी आहे. अर्थमंत्रीपदही त्यांच्याकडे आहे, त्यामुळे अर्थसंकल्पाची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे. असे असूनही कंड्या पिकवायला त्यांना वेळ कसा मिळतो? असा खोचक सवाल करत, उपमुख्यमंत्रीपद असणे आणि सहा-सहा खाती सांभाळणे, हे खूप जबाबदारीचे काम आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"