Congress Balasaheb Thorat News:काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशातील आरक्षणाबाबत परदेशात केलेल्या विधानावरून राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भाजपाने राज्यात आंदोलन केले. तसेच राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. भाजपाकडून केल्या जात असलेल्या टीकेचा काँग्रेसकडून खरपूस शब्दांत समाचार घेण्यात आला.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना धमकी देणारा दिल्लीतील भाजपाचा माजी आमदार आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या भाजपा विरोधात काँग्रेसने राज्यभर आंदोलन करून भाजपाचा निषेध केला. भाजपाने केलेल्या आंदोलनासंदर्भात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रश्न उपस्थित केले. तसेच भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.
आरक्षण बंद करणार असे राहुल गांधी बोललेच नाहीत तर भाजपाचे आंदोलन कशासाठी?
आरक्षण बंद करणार असे खासदार राहुल गांधी कधीही बोललेले नाहीत, त्यामुळे भाजपाने नेमके कशासाठी आंदोलन केले? भाजपा स्वत:च फेक न्यूज पसरवून आंदोलनाच्या नौटंक्या करत आहे. भाजपाचे नेते सत्यता पडताळून पाहण्याची तसदीही घेत नाहीत. त्यांना अज्ञानात आनंद घेण्याची सवय लागली आहे. भाजपाच्या या फेक नॅरेटिव्हला जनता भुलणार नाही. भाजपाच संविधान आणि आरक्षणविरोधी आहे हे सत्य जनतेला माहिती आहे, या शब्दांत थोरात यांनी निशाणा साधला.
आरक्षण बंद करणार असे राहुल गांधी खरेच म्हणाले का?
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बाबतच्या आरक्षण रद्द करण्याबाबतच्या अनेक पोस्ट सध्या व्हायरल करण्यात येत आहेत. राहुल गांधी अमेरिकेत असताना आरक्षण बंद करणार असे म्हणाले, असा दावा करून या पोस्ट व्हायरल करून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. मात्र करण्यात येत असलेला दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. आपल्या अमेरिका दौऱ्यात राहुल गांधी यांनी जॉर्जटाऊन विद्यापीठातील एका विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना, भारत सर्वांसाठी समान देश होईल तेव्हाच आम्ही आरक्षण संपवण्याचा विचार करू. सध्या भारताची स्थिती अशी नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. मात्र काही लोक अर्धेच व्हिडीओ व्हायरल करून त्यांच्याबाबत संभ्रम निर्माण करत आहेत.