देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल करा, एसआयटी नेमा; काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 10:17 PM2021-04-29T22:17:45+5:302021-04-29T22:20:03+5:30
भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि विरोधक भाजप एकमेकांसमोर उभे ठाकले असून, अनेक मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. एकीकडे कोरोनाचा कहर कायम असताना, दुसरीकडे राजकारणही तापलेले पाहायला मिळत आहे. यातच आता भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. (congress bhai jagtap demands that lodge fir against devendra fadnavis and pravin darekar)
काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्याविरोधात सरकारने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना भेटून ही मागणी केल्याचंही भाई जगताप यांनी सांगितले.
राज्यात १५ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची गरज; मुंबई हायकोर्टाची सरकारला सूचना
तपास करण्यासाठी एसआयटी नियुक्त करावी
मुंबई पोलिसांना धमकावल्या प्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर भादंवि कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करावा. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नियुक्त करावी, अशी मागणी करत सरकार तात्काळ ही कारवाई करेल अशी आशा आहे. संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यासाठी सरकारला पत्र दिले आहे. त्याला आठ दिवस उलटले तरी अद्यापही निर्णय घेण्यात आला नाही, अशी खंत जगताप यांनी यावेळी व्यक्त केली.
नवे संसद भवन महत्त्वाचे की नागरिकांचे लसीकरण? पवारांचा रोखठोक सवाल
राज्य सरकार गुन्हा का दाखल करत नाही
सचिन वाझेंच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल होऊ शकतो, तर बीकेसी प्रकरणी स्वतः जाऊन पत्र दिले आहे. मग राज्य सरकार गुन्हा का दाखल करत नाही, अशी विचारणा भाई जगताप यांनी केली. बीकेसी पोलीस ठाण्यात रात्रीच्यावेळी एका व्यापाऱ्याला वाचवण्यासाठी राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते पोहचले होते. याप्रकरणी ते त्या व्यापाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावाही जगताप यांनी केला.