ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 16 - गोव्यात सर्वाधिक जागा जिंकूनही विरोधी पक्षात बसावे लागलेल्या काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. गोव्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि आमदार विश्वजीत राणे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. गोव्यातील जनतेने जो कौल दिला त्याचा पक्षाने विश्वासघात केला असा आरोप विश्वजीत राणे यांनी केला. ते काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमधील मुख्य दावेदार होते.
विश्वजीत राणे काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील अशी मागच्या दोन ते तीन दिवसापासून चर्चा होती. अखेर ती आज खरी ठरली. गोवा विधानसभेत आज मनोहर पर्रिकरांनी बहुमताची कसोटी जिंकली. गुरुवारी सकाळी त्यांनी 22 आमदारांच्या पाठिंब्यासह गोवा विधानसभेत बहुमत सिद्ध केले. 40 सदस्यांच्या गोवा विधानसभेत बहुमतासाठी 21 आमदारांचा पाठिंबा आवश्यक होता. 13 जागा जिंकणा-या भाजपाने अन्य छोटे पक्ष आणि अपक्षांनी मोट बांधून बहुमत सिद्ध केले.
गोव्यात सर्वाधिक 17 जागा जिंकूनही काँग्रेसला विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने भाजपला दोन दिवसांत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. गोव्यात काँग्रेसला सर्वाधिक जागा (17) जिंकूनही सत्ता स्थापण्याचा दावा करता आला नाही, तर केवळ 13 जागा जिंकूनही राज्यपालांनी भाजपाला सरकार स्थापण्यासाठी आमंत्रण दिले, या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात कॉंग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यामुळे याकडे देशाचं लक्ष लागलं होत.
40 सदस्य असलेल्या विधानसभेत एकूण 22 आमदारांचे संख्याबळ पर्रीकर सरकारसोबत आहे. त्यात भाजपाचे स्वत:चे 13 आमदार आहेत. कुंकळयेकर यांची हंगामी सभापती म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय पर्रीकर यांनी घेतला. बुधवारी सकाळी त्याबाबतची फाईल सरकारने राज्यपालांकडे पाठवली व सायंकाळी राज्यपालांनी कुंकळयेकर यांना शपथ दिली. राजभवनवर त्या वेळी मुख्यमंत्री पर्रीकर उपस्थित होते. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी बुधवारी मंत्रालयात केबिनचा ताबा घेतला व काम सुरू केले. अन्य मंत्र्यांना अजून खाती मिळालेली नसल्याने त्यांनी केबिनचा ताबा घेतलेला नाही. बहुमत सिद्ध केल्यानंतर आपण खाते वाटपाची प्रक्रिया सुरू करीन, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी म्हटले आहे.