लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : येत्या शुक्रवारी ९ जून रोजी होणाऱ्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेससह भाजपा, शिवसेना व कोणार्कच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून त्यासाठी सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी सचिव कार्यालयात सोमवारी गर्दी केली होती.महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर निवडून आलेल्या नगरसेवकांनी कोकण भवन येथे आपल्या गटांची नोंदणी केल्यानंतर महापौरपदाची निवडणूक येत्या शुक्रवारी ९ जून रोजी होणार आहे. सध्या रमजान महिना सुरू असल्याने मुस्लिमबांधवांना शुक्रवारची नमाज अदा करावयाची असते. त्यामुळे निवडणुकीची कार्यवाही दुपारी २ ते ५ वाजेदरम्यान सुरू होईल, अशी माहिती मनपाचे सचिव अनिल प्रधान यांनी दिली. सोमवारी सकाळी सचिव कार्यालयातून अर्ज घेऊन उमेदवारांनी दुपारनंतर आपले अर्ज दाखल केले. त्यापैकी महापौरपदासाठी ७ व उपमहापौरपदासाठी ७ असे एकूण १४ अर्ज दाखल करण्यात आले. यात महापौरपदासाठी जावेद दळवी (काँग्रेस), सुमित पाटील (भाजपा), विलास पाटील (कोणार्क), तुषार चौधरी (शिवसेना), मदन बुवा नाईक (शिवसेना), प्रकाश टावरे (भाजपा), शाहिन सिद्दीकी (भाजपा), तर उपमहापौरपदासाठी अब्बास अली अन्सारी (समाजवादी पार्टी), हनुमान चौधरी (भाजपा), मनोज काटेकर ( शिवसेना), प्रशांत लाड (काँग्रेस), मदन बुवा नाईक (शिवसेना), नितीन आर पाटील (कोणार्क विकास आघाडी) यांचा समावेश आहे. काँग्रेसचे उमेदवार जावेद दळवी यांच्याबरोबर माजी मंत्री वकार मोमीन, माजी खासदार सुरेश टावरे, प्रदेश सचिव प्रदीप (पप्पू) रांका तर भाजपा व कोणार्क विकास आघाडीच्या उमेदवारांसोबत खासदार कपिल पाटील, शहराध्यक्ष तथा नगरसेवक संतोष शेट्टी, कोणार्कचे विलास पाटील उपस्थित होते.
भिवंडी महापौरपदासाठी काँग्रेस-भाजपा लढत
By admin | Published: June 08, 2017 3:27 AM