पुणे : महापालिका निवडणुकीत घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील गोंधळ चौथ्या दिवशीही सुरू राहिला़ अर्ज माघारीच्या वेळी कॉँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नगरसेवक गणेश बीडकर आणि नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्यात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोरच जोरदार वादावादी झाली. मंगळवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमले होते. प्रभाग क्रमांक १६ क मधून कॉँग्रेसतर्फे रवींद्र धंगेकर कॉँग्रेसचे उमेदवार अस्लम बागवान यांच्या माघारीसाठी कार्यकर्त्यांसह आले होते. एका महिला उमेदवाराच्या माघारीसाठी भाजपचे उमेदवार गणेश बिडकर हेही तेथे आले. उमेदवारांव्यतिरिक्त इतरांना आत येण्यास पोलिसांनी मज्जाव केला़ तेव्हा बीडकर यांच्याबरोबर इतरांना कसे सोडले, असे कार्यकर्ते पोलिसांना विचारू लागले़ बीडकर यांनी बागवान यांना अर्ज मागे न घेण्यासाठी फूस लावली, असा आरोप धंगेकर यांनी केला. कर्मचारी आणि पोलिसांनी धंगेकर यांना बाहेर जाण्यास सांगितले़ तेव्हा त्यांनाही बाहेर जायला सांगा की, असे धंगेकर म्हणाले़ त्याला बीडकर यांनी प्रतिउत्तर दिले़ त्यातून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोरच बाचाबाची झाली. दोघांचेही समर्थक एकमेकांना भिडले. कार्यालयातील खुर्च्या एकमेकांवर भिरकावण्यात आल्या. आम्ही कोणाला भीत नाही, असे म्हणून दोघांनीही त्यांच्या कार्यकर्त्यांना आत या रे असा आवाज दिला़ त्याबरोबर दोघांचेही समर्थक आत शिरले़ त्यांनी परस्परांना शिवीगाळ, मारहाण करण्यास सुरुवात केली़ निवडणूक आयोगाच्या कॅमेरामनने हे सर्व शूटिंग केले़ कार्यालयातच चार ते पाच मिनिटे ही मारामारी सुरू होती़
काँग्रेस-भाजपाचे कार्यकर्ते भिडले
By admin | Published: February 08, 2017 3:29 AM