RSS च्या बालेकिल्ल्यातून काँग्रेसने फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग, अनेक नेत्यांची उपस्थिती...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 04:27 PM2023-12-28T16:27:55+5:302023-12-28T16:28:36+5:30
नागपुरात काँग्रेसच्या महारॅलीला पक्षातील जवळपास सर्वच प्रमुख नेते उपस्थित आहेत.
Congress :काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा(RSS) बालेकिल्ला असलेल्या नागपुरातून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. आज(दि.28) काँग्रेसचा 139 वा स्थापना दिवस आहे. या निमित्ताने काँग्रेसने नागपुरात ‘हैं तैयार हम’ महारॅलीचे आयोजन केले आहे. या मेगा रॅलीला राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे संबोधित करतील.
लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने उरले आहेत. काँग्रेसला सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेस आतापर्यंतच्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. सध्या काँग्रेस फक्त तीन राज्यांत स्वबळावर सत्तेवर असून तीन राज्यांत मित्रपक्ष म्हणून सामील आहे. अशा स्थितीत 2024 च्या लोकसभा निवडणुका काँग्रेससाठी 'करो या मरो' अशा असणार आहेत.
LIVE: हैं तैयार हम | नागपुर, महाराष्ट्र https://t.co/5lXNPDMy5m
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 28, 2023
राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्ता गमावल्यानंतर काँग्रेसने भाजपची वैचारिक संघटना असलेल्या RSS च्या बालेकिल्ल्यात रॅली काढून 2024 च्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करण्याची रणनीती आखली आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याशिवाय, पक्षातील 247 प्रमुख नेते, बहुतांश खासदार आणि 600 पैकी सुमारे 300 आमदार या रॅलीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या मेगा रॅलीत किमान 10 लाख लोक जमतील, अशी आशा पक्षाने व्यक्त केली आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्रावर विशेष लक्ष
एकीकडे संघाचा बालेकिल्ला असल्याने काँग्रेस नागपुरात मेळावा घेत आहे तर दुसरीकडे राहुल गांधींच्या 'भारत न्याय' यात्रेचा समारोप मुंबईत होणार आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. काँग्रेसने महाराष्ट्रात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे. तसेच, राज्यात मराठा-ओबीसी वाद भाजपसाठी चिंतेचे कारण बनू शकते. ही सर्व समीकरणे डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेसने महाराष्ट्रातून निवडणूक प्रचाराची सुरुवात करत आहे.