मुंबई : राज्य सरकारच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त जाहिरातबाजी, सेलिब्रेशनसाठीच देवेंद्र फडणवीस सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करात वाढ केल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसतर्फे आझाद मैदान येथे आयोजित बैलगाडी मोर्चावेळी चव्हाण बोलत होते. शेतकऱ्यांच्या नावाखाली करवाढ करणाऱ्यांनी केंद्रातून शेतकऱ्यांसाठी निधी का आणला नाही, असा सवालही चव्हाण यांनी या वेळी केला. राज्य शासनाने नुकताच पेट्रोल-डिझेलवर प्रतिलीटर २ रुपयांचा अधिभार लावत इंधन दरवाढीचा निर्णय केला. या निर्णयाविरोधात अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने बैलगाडी आंदोलन केले. राज्यात दुष्काळी परिस्थिती असून, सर्वसामान्य जनता आधीच भाववाढीमुळे त्रस्त आहे. अशा वेळी पेट्रोल आणि डिझेलवरील दरवाढ सर्वसामान्यांना आणखी अडचणीत आणणारी असल्याची टीका संजय निरुपम यांनी केली. भाजपा सरकारच्या कामकाजाची पद्धत पाहिली तर ही करवाढ राज्य सरकारच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या जाहिरतबाजीसाठी असल्याचे दिसून येते. ३१ आॅक्टोबरला राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारला एक वर्ष पूर्ण होणार आहे. या दिवशी आपल्या तथाकथित कामगिरीचा ढोल बडविण्यासाठी राज्य सरकार मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करणार आहे. या जाहिरातीचा खर्च भरून काढण्यासाठी इंधन दरवाढ केलेली आहे, असा आरोप निरुपम यांनी केला. ‘अच्छे दिन’ गेले कुठे?भाजपाने निवडणुकीपूर्वी ‘अच्छे दिना’चे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात वाढती महागाई व पंतप्रधानांचे वाढते परदेश दौरेच जनतेला पाहावे लागत आहेत. रेल्वे-बस भाडेवाढ, पेट्रोल-डिझेलच्या दरातील वाढ, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि बेरोजगारीच जनतेच्या वाट्याला आल्याचे निरुपम म्हणाले.
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा
By admin | Published: October 06, 2015 3:37 AM