मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत. मात्र असे असले तरीही भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मलकापुरात यावेळी काँग्रेसने विजयाचा झेंडा फडकावला आहे. सलग पाच वेळा निवडून येणारे व भाजपचे उमेदवार चैनसुख संचेती यांचा विजयाचा रथ यावेळी काँग्रेसचे उमेदवार राजेश एकाडे यांनी रोखले आहे.
भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मलकापूरमध्येचैनसुख संचेती यांनी आपल्या मतदारसंघात भाजपचा विजयाचा झेंडा अबाधित ठेवला होता. १९९५ पासून आजपर्यंत संचेती यांनी मतदारसंघाच नेतृत्व आपल्याकडे कायम ठेवले होते. पहिल्यांदा अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवणाऱ्या संचेती यांनी नंतर भाजपच्या तिकीटावर कायम निवडणूक लढवत विजयाची मालिका कायम ठेवली. काँग्रेसने प्रत्येकवेळी नवीन चेहरा देऊन संचेती यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांना आजपर्यंत संचेती यांच्या विरोधात ५० हजाराच्या मतांचा टप्पा सुद्धा पार करता आला नव्हता.
विधानसभा निवडणुकीत मात्र यावेळी संचेती यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. काँग्रेसकडून रिंगणात असलेल्या राजेश एकाडे यांनी यावेळी भाजपाचे उमेदवार चैनसुख संचेती यांच्या विजयी षटकाराला धक्कादायक रित्या रोखले आहे. गत पंचवीस वर्षापासून आमदार चैनसुख संचेती यांच्या रूपाने भाजपाचे वर्चस्व अबाधित राहिलेल्या मलकापूर विधानसभा मतदारसंघ आता काँग्रेसच्या ताब्यात आले आहे.
गेल्या सहा विधानसभा निवडणुकीपासून या मतदारसंघातून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात होते. प्रत्येकवेळी काँग्रेसने येथून नवीन चेहरा देऊन पाहिला.मात्र काँग्रेसला विजय मिळवता आला नव्हता. यावेळी सुद्धा भाजपने या मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या जाहीर सभा घेत आपला गड कायम राखण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेसचे राजेश एकडे यांच्या विजयाने भाजपाची सारी राजकीय समीकरणे फोल ठरवली.