आरमोरीत गेडाम गटात अस्वस्थता; काँग्रेसची 'नवा भिडू' देण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 01:12 PM2019-07-27T13:12:26+5:302019-07-27T13:12:50+5:30
लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेपेक्षा भाजपच्या उमेदवाराला अधिक मते मिळाली.
मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. माजी आमदार आनंदराव गेडाम यांना उमेदवारीसाठी पक्षातून वामनराव सावसाकडे यांचे आव्हान असणार आहे. तर लोकसभा निवडणुकीत आरमोरीमध्ये भाजपच्या उमेदवाराला मिळाले मताधिक्य पाहता, यावेळी काँग्रेसकडून विधानसभेला 'नवा भिडू' देण्याची तयारी सुरु असल्याची चर्चा आहे.
आरमोरी विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातासाठी राखीव आहे. युतीत शिवसेनेकडे असलेल्या या मतदारसंघात गेल्यावेळी भाजप-शिवसेना वेगवेगळे लढल्याने, १९६२ नंतर पहिल्यांदाच येथून भाजपचा उमेदवार निवडून आला होता. तर काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांचा भाजपचे विद्यामान आमदार कृष्ण गजबे यांनी पराभव केला होता. यावेळी पुन्हा काँग्रेसकडून गेडाम यांनी तयारी सुरु केली आहे. मात्र त्यांना पक्षातील वामनराव सावसाकडे यांचे आव्हान असणार आहे. सावसाकडे यांनी उमेदवारीसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. तर लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेपेक्षा भाजपच्या उमेदवाराला अधिक मते मिळाली. त्यामुळे यावेळी पक्षाकडून नवीन चेहऱ्याला संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
आरमोरी विधानसभा मतदारसंघात जातीचे समीकरणे पहिले तर, या मतदारसंघात माना जमातीची मतदार संख्या मोठ्याप्रमाणात आहेत. त्यामुळे सावसाकडे यांना उमेदवारी दिल्यास याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो. एकीकडे गेडाम यांचे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु आहे, तर दुसरीकडे सावसाकडे यांनी मतदारसंघ पिंजून काढायला सुरवात केली आहे. त्यामुळे ऐनवेळी कुणाच्या पारड्यात उमेदवारी पडणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.