मुंबई : काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते ५ ते ७ मे या काळात मराठवाड्याचा दौरा करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली.यासंदर्भात गांधी भवन येथे पत्रकारांना माहिती देताना खा. चव्हाण म्हणाले की, काँग्रेसचे नेते सातत्याने दुष्काळी भागात फिरून लोकांच्या अपेक्षा सरकारच्या निदर्शनास आणून देत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आपल्यासह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात, शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे, नितीन राऊत, सतेज पाटील आदी नेते राज्यातील दुष्काळी जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.प्रत्येक जिल्ह्यात जाऊन दुष्काळग्रस्त जनता, काँग्रेस कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांच्या ते भेटी घेतील. तसेच दुष्काळी उपाययोजनांचा आढावा घेतील. गेल्या महिन्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठक लातूरमध्ये झाली होती व त्यामध्ये अनेक निर्णयांची घोषणा झाली होती. त्या निर्णयांची अंमलबजावणी झाली की नाही, याची या दौऱ्यात समीक्षा केली जाईल, असेही ते म्हणाले.दुष्काळ निवारणातील सरकारच्या अपयशावर त्यांनी टीका केली. या सरकारच्या कार्यकाळात २०१५मध्ये सर्वाधिक ३२२४ शेतकरी आत्महत्या झाल्या. या गंभीर परिस्थितीची दखल न्यायालयानेसुद्धा घेतली. परंतु, सरकार त्याबाबत गंभीर दिसत नाही. नियोजनानुसार पाणीपुरवठा न करताच टँकरमाफिया पैसा लाटत आहेत. सरकार पाठीशी उभे राहत नसल्याने अधिकारी ठोस निर्णय घेण्यास तयार नाहीत.रोजगार हमीची पुरेशी कामे उपलब्ध नाहीत. लोकांचे स्थलांतर वाढले आहे. या परिस्थितीत काही मंत्री हेलिकॉप्टरने फिरत आहेततर काही मंत्री सेल्फी काढण्यातगुंग आहेत. त्याऐवजी मंत्र्यांनी लोकांशी संवाद वाढवला तर त्यांना चार-दोन चांगली कामे करता येतील, असा टोला खा. चव्हाण यांनी लगावला.पुणे येथील स्वस्त घरकूल प्रकरणी त्यांनी भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, या प्रकरणातील संशयित आरोपीची पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासोबतची छायाचित्रे समोर आली आहेत. मंत्र्यांच्या समक्षच हा आरोपी पळून जातो. तरीही त्याच्याशी आपला संबंध नसल्याचा दावा मंत्री करतात, हे हास्यास्पद आहे. संघाशी जवळीक असलेला वर्धा जिल्ह्यातील कापूस व्यापारी सुनील टालाटुले याने अद्याप शेतकऱ्यांचे ८ कोटी रुपये दिलेले नसून त्याच्या संपत्तीचा लिलाव करून चुकारे करण्याची सरकारची घोषणा हवेतच आहे, असा आरोप त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)
काँग्रेसचे प्रमुख नेतेही दौऱ्यावर
By admin | Published: April 23, 2016 4:00 AM