मुंबई : शिवसेनेचे विनायक राऊत यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी 21 ऑगस्टला निवडणूक होत असून या जागेवर काँग्रेसने दावा सांगितला आहे.
2क्12 मध्ये विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून आलेले राऊत यांनी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी आमदारकीचा राजीनामा दिला होता. या जागेवर आता कॉंग्रेसने दावा सांगितला असून राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळविण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे लवकरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करतील, असे सूत्रंनी सांगितले. विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ राष्ट्रवादीपेक्षा 2क् ने अधिक आहे, तसेच धनंजय मुंडे यांना विधान परिषदेवर निवडून येण्यासाठीे कॉंग्रेसने पाठिंबा दिला होता. हे मुद्दे विधान परिषदेची जागा मागताना काँग्रेसतर्फे पुढे केले आहेत.
राऊत यांच्या जागेवर शिवसेनेने उमेदवार दिला तर या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. तथापि, आघाडीकडे असलेले भक्कम संख्याबळ लक्षात घेता मतांची फाटाफूट झाली नाही तर सत्तारुढ पक्षाच्या उमेदवाराला निवडून येण्यात अडचण दिसत नाही.
शिवसेनेचे विधानसभेतील नेते सुभाष देसाई यांच्याशी संपर्क
साधला असता ते म्हणाले की शिवसेनेचा उमेदवार देण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन योग्यवेळी आम्ही निर्णय घेऊ.
(विशेष प्रतिनिधी)