गणेश मुर्तीची विटंबना केल्याप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 08:08 PM2018-09-24T20:08:54+5:302018-09-24T20:10:49+5:30
मिरवणूक सुरु असताना कार्यकर्त्यांसह गणेश मूर्तीची विटंबना केल्याप्रकरणी काँग्रेस नगरसेवक आणि माजी मंत्री रमेश बागवे यांचे पुत्र अविनाश बागवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना खडक पोलिसांनी अटक केली.
पुणे : मिरवणूक सुरु असताना कार्यकर्त्यांसह गणेश मूर्तीची विटंबना केल्याप्रकरणी काँग्रेस नगरसेवक आणि माजी मंत्री रमेश बागवे यांचे पुत्र अविनाश बागवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना खडक पोलिसांनीअटक केली. गणेश मंडळाची विजर्सन मिरवणुक जात असताना कार्यकर्त्यांना ओढा रे, मारा, सोडू नका असे म्हणून चिथावणी देवुन ट्रॅक्टर चालक व साऊंड सिस्टीमच्या मालकास मारहाण करण्यास सांगणार्या तसेच गणेश मुर्तीची विटंबना केल्याप्रकरणी खडक पोलिसांनीकाँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांना अटक केली आहे. त्यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी युवराज सुलतान अडसुळ (27, रा. राजीव गांधी सोसायटी, कासेवाडी, भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अविनाश बागवे, त्यांचे बंधू यासेर बागवे आणि विवेक उर्फ बंटी बागवे, दयानंद अडागळे, जयवंत मोहिते, सुरज कांबळे, कुमार अडागळे, नितीन कसबे, बापु कसबे, गणेश जाधव, बागवे यांचे पीए अरूण गायकवाड, सुरेखा खंडाळे, विठ्ठल खोरात, परेश गुरव, अविनाश बागवे यांचे मेहुणे सुरज कांबळे आणि शिवाजी काळे (सर्व रा. कासेवाडी, भवानीपेठ) यांच्याविरूध्द भादंवि 143,146,148,149,295,296,323,427,504, महाराष्ट्र कायदा कलम 37 (1)(3) सह कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भवानीपेठेतील कासेवाडी येथील अशोक तरूण मंडळाची मिरवणुक विजर्सनासाठी राजीव गांधी पतसंस्थेच्या समोरील सार्वजनिक रोडवरून जात होती. त्यावेळी बागवे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना ओढा रे, मारा, सोडू नका असे म्हणून चिथावणी दिली. त्यांनी ट्रॅक्टर चालक सोमनाथ मस्के आणि साऊंड सिस्टीमचे मालक ओंकार पंढरीनाथ कोळी यांना मारहाण करण्यास सांगितले. आरोपींनी मस्के आणि कोळी यांना हाताने मारहाण केली तसेच साऊंड सिस्टीमची तोडफोड करून नुकसान केले. आरोपींनी गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीस अडथळा निर्माण केला. आरोपींनी पायातील बुट, चप्पल, दगड फेकुन गोंधळ घातला आणि मिरवणुकीदरम्यान गणेश मुर्तीची विटंबना केली.या गुन्हयाचा पुढील तपास खडक पोलिस करीत आहेत.