मोदी 'जुमला किंग' तर अमित शहांचे 'ये तो निवडणूक जूमला था' विधान झाले सुपरहीट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 07:18 PM2018-09-08T19:18:25+5:302018-09-08T19:36:33+5:30
काँग्रेस आता टेक्नो सँव्ही झाल्याचे काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र जनसंघर्ष यात्रेच्या समारोप सभेतील वातावरणावरून दिसून आले.
पुणे : सन 2014 च्या निवडणुकीत डिजीटल वापरात मागे पडल्यामुळे त्याचा मोठा फटका काँग्रेसला बसला. मात्र त्यामुळेच काँग्रेस आता टेक्नो सँव्ही झाल्याचे काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र जनसंघर्ष यात्रेच्या समारोप सभेतील वातावरणावरून दिसून आले.मोदी म्हणजे जुमला किंग असे संबोधत काँग्रेसकडून भाजपने दिलेल्या आश्वासनांचा पाढा वाचत ही आश्वासनं म्हणजे निवडणूक जिंकण्यासाठीचा जुमले होते असा आरोप करण्यात आला. एका व्हिडिओच्या आधारे भाजपच्या आश्वासनांची खिल्ली उडवण्यात आली.
काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र जनसंघर्ष यात्रेचा समारोप आज पुण्यात होत आहे. पुण्यातील एसएसपीएमएस च्या मैदानावर हि सभा होत आहे. या सभेला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, युवा काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम आदी उपस्थित आहेत. व्यासपीठावर मागच्याच बाजूला भला मोठा डिजीटल स्क्रीन लावण्यात आला होता. त्याशिवाय व्यासपीठाच्या दोन्ही बाजूंनाही मोठे स्क्रिन होते. चित्रफितींच्या माध्यामांतूनही भाजपाने मागील निवडणुकीत टिकेची झोड उठवली होती. ते लक्षात ठेवून काँग्रेसनेही आता अशा चित्रफिती तयार केल्या आहेत. त्यातील चुनावी जूमला या पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमीत शाह यांच्या निवडणूकीतील भाषणांची खिल्ली उडवणारी चित्रफितीला जोरदार प्रतिसाद मिळाला.
सभेच्या ठिकाणी दोन मोठे स्क्रीन होते. त्यावर भाजपा सरकारच्या विविध घोटाळ्यांच्या मालिका चित्रफितीने दाखवण्यात आली. मोदी. अमीत शाह फडणवीस ठाकरे यांची आश्वासने व ती कशी खोटी ठरली हे त्यात होते. प्रत्येक आश्वासनानंतर अमीत शाह यांचे ये तो निवडणूक जूमला था हे वक्तव्य होते. त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला.