सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची भाजपाकडून फसवणूक, ६ हजारांचा भाव कधी देणार?; काँग्रेसची विचारणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 16:55 IST2025-02-05T16:53:03+5:302025-02-05T16:55:09+5:30
Congress Nana Patole News: भाजपा महायुती सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची भाजपाकडून फसवणूक, ६ हजारांचा भाव कधी देणार?; काँग्रेसची विचारणा
Congress Nana Patole News: राज्यातील विशेष करून विदर्भ व मराठवाड्यातील सोयाबीन शेतकऱ्यांकडे अद्याप लाखो क्विंटल सोयाबीन पडून आहे. ६ फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र सुरु ठेवण्यात येणार आहेत. परंतु या कालावधीत शेतकऱ्यांकडील सर्व सोयाबीन खरेदी होणार नाही. राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडून सर्व सोयाबीन खरेदी करेपर्यंत ही खरेदी केंद्रे सुरु ठेवावीत. वेळप्रसंगी खरेदी केंद्रांची संख्या वाढवा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यात ३० लाखांहून अधिक सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत, यातील जवळपास साडेसात लाख सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यभरातील विविध खरेदी केंद्रांवर नोंदणी केली आणि त्यातील साधारणपणे तीन, साडेतीन लाख शेतकऱ्यांकडील सोयाबीन खरेदी करण्यात आल्याचे समजते. यातील बहुतांश शेतकऱ्यांनी बाजारात मिळेल त्या किंमतीला सोयाबीन विकले आहे. खुल्या बाजारात व बाजार समितीत सोयाबीनला ३५०० ते ४००० हजार रुपये भाव मिळत आहे. तर हमी भाव ४८५१ रुपये आहे. सोयाबीनसाठी होणारा खर्च व बाजारातील भाव पाहता शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही काळजी घेत खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी व जोपर्यंत शेतकऱ्यांकडील सर्व सोयाबीनची खरेदी होत नाही तोपर्यंत खरेदी केंद्रे सुरू ठेवावीत, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
भाजपा महायुती सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरु केल्यानंतर सुरुवातीला साठवणुकीचा प्रश्न उभा राहिला, त्यानंतर बारदाणा नसल्याची सबब सांगण्यात आली. एकूण सरकारी खरेदी केंद्रावर सावळा गोंधळच पाहायला मिळाला. ०६ फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढवली असली तरी अद्याप लाखो क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. आधीच भाव कमी त्यात खरेदी केंद्रे बंद केली तर मिळेत त्या भावाला सोयाबीन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येईल व यातून त्यांचे मोठे नुकसान होईल. भाजपा महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सोयाबीनला ६ हजार रुपये भाव देण्याचे आश्वासन दिले, पण ते पाळले नाही. आतापर्यंत खरेदी केलेल्या सोयाबीनचे पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. धानाची व कापसाची अवस्थाही अशीच आहे. धान खरेदीही कमी भावात केली जात आहे तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हालही तसेच असून भाजपा महायुती सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
दरम्यान, काँग्रेसने वाढलेल्या मतदार संख्येवर आक्षेप घेतला आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे मांडलेल्या भूमिकेनंतर ईव्हीएमवर आक्षेप नाही. वाढलेले मतदार आले कुठून हे स्पष्ट करावे. आम्ही निवडणूक आयोगाकडे मागणी केली तर भाजपाच्या पोटात दुखते. राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात महाराष्ट्र बदनाम होत आहे. आम्ही स्वतः या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागणार आहोत. देशाच्या जनतेच्या लक्षात आणून देणार आहोत, असे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.