मुंबई : राज्यात महाविकास आघाडीच सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी पक्ष आणि भाजपच्या नेत्यांमध्ये सतत आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. तर काँग्रेस शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर करत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यांच्या आरोपाला काँग्रेसने उत्तर दिले असून, "सत्ता गेल्याने भाजप नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले" असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, काँग्रेस शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर करत आहे. मी शिवसेनेचा हितचिंतक आहे. ते होते म्हणून मराठी माणूस, हिंदू माणूस वाचला. ही काँग्रेस शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर नेत आहेत. त्याच्या बदल्यात मनसेला जागा करून दिली जात आहे. सर्वसामान्य माणसाच्या मनात हिंदुत्ववादी म्हणून मनसे आणि भाजप येत आहे याचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा. हा अतिशय आखलेला डाव आहे असं पाटील म्हणाले होते.
तर सत्ता गेल्यामुळे भाजप नेते वैफल्यग्रस्त झालेत. याच वैफल्यातून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. चंद्रकांत पाटील यांचे बेताल वक्तव्य त्याचेच उदाहरण. सतत लोकांना सल्ले देणा-या चंद्रकांत पाटलांना आमचा प्रेमाचा सल्ला आहे, भाषेचे भान राहुद्या नाहीतर फुकट शोभा होईल, असा टोला काँग्रेसने लगावला.