काँग्रेसने दिल्लीत फॉर्म्युला ठरवला, शरद पवारांना ६ जागा; वंचितच्या प्रस्तावावर चर्चाच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 08:38 AM2024-03-20T08:38:42+5:302024-03-20T08:39:40+5:30
Maharashtra Politics: काँग्रेसच्या स्क्रीनिंग समितीची मंगळवारी पक्षाच्या मुख्यालयात बैठक झाली. यामध्ये विविध राज्यांच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील उमेदवार निश्चित करण्यासाठी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज ठेवण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसकडे तुम्ही सांगाल त्या सात जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसेच भविष्यातील आघाडीचेही आमिष दाखविले आहे. यातच मंगळवारी काँग्रेसच्या समितीची दिल्लीत बैठक झाली. यामध्ये काँग्रेसने वंचितसह आणि वंचितशिवाय असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविला आहे. यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोजक्या ६ जागा देण्यात येणार आहेत. या फॉर्म्युल्यावरून पुन्हा महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
काँग्रेस २१ मार्चला उद्धव ठाकरे शिवसेना गट आणि शरद पवार राष्ट्रवादी यांच्यासोबत जागावाटपाच्या फॉर्म्युल्याला अंतिम रुप देऊ शकते. आजतकच्या सुत्रांनुसार महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी काँग्रेसने तीन पक्षांमध्ये वंचित सोबत आली तर 23-14-6 अशा फॉर्म्युल्यावर चर्चा केली आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंना २३, काँग्रेस १४ आणि शरद पवारांना ६ अशा जागा आहेत. तर वंचितला ४ जागा आणि राजू शेट्टींची एक अशा ४८ जागा वाटप असणार आहे.
परंतु, जर वंचित सोबत आली नाही ठाकरे, पवारांच्या जागा तितक्याच राहणार असून वंचितला सोडलेल्या ४ जागांवर काँग्रेसच लढणार असल्याची चर्चा करण्यात आली. जागावाटपाची घोषणा गुरुवारी, २१ मार्चला मुंबईत होण्याची शक्यता असून वंचितचा प्रस्ताव काँग्रेसने विचारात घेतला नाही.
काँग्रेसच्या स्क्रीनिंग समितीची मंगळवारी पक्षाच्या मुख्यालयात बैठक झाली. यामध्ये विविध राज्यांच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील उमेदवार निश्चित करण्यासाठी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज ठेवण्यात आली आहे. कालच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व महाराष्ट्रातील प्रभारी रमेश चेन्निथला हे उपस्थित होते. या बैठकीला राहुल गांधी अनुपस्थित होते.