राधाकृष्ण विखे : भाजपचा अधिकृत प्रस्तावच नाहीअहमदनगर : २१ जून रोजी होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीसंदर्भात पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे यांनी कॉँग्रेस नगरसेवकांची मते रविवारी जाणून घेतली. त्याचा अहवाल प्रदेश कॉँग्रेसला दिला जाणार आहे. प्रदेश पातळीवर चर्चा करूनच पक्षाचा निर्णय जाहीर केला जाईल, असे स्पष्ट करत भाजपकडून कॉँग्रेसला कोणताही प्रस्ताव सादर झालेला नसल्याचे त्यांनी नगरसेवकांना सांगितले. महापौर पदाच्या निवडणुकीसंदर्भात काय भूमिका घ्यायची, यासाठी विखे यांनी कॉँग्रेसच्या ११ नगरसेवकांची बैठक लोणी येथे घेतली. दीप चव्हाण, सुवर्णा कोतकर वगळता सुनील कोतकर, रुपाली वारे, फैय्याज शेख, सविता कराळे बैठकीला उपस्थित होते. कोतकर, चव्हाण यांनी विखे यांना उपस्थित राहणार असल्याचे अगोदरच कळविले होते. कॉँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांकडे लक्ष देण्यास शहरात कोणी वाली राहिलेला नाही. भाजपला पाठिंबा देण्याची चर्चा आहे, यासंदर्भात काय भूमिका आहे, अशी विचारणा नगरसेवकांनी केली. त्यावर विखे यांनी वृत्तपत्रात वृत्त प्रकाशित होणे व अधिकृत प्रस्ताव येणे, या दोन वेगळ्या बाबी आहेत. भाजपकडून असा कोणताच अधिकृत प्रस्ताव आलेला नाही. महापौर पद मिळविण्याइतपत संख्याबळ कॉँग्रेसकडे नाही. नगरसेवकांच्या बैठकीतील अहवाल प्रदेश कॉँग्रेसला दिला जाईल. प्रदेश कॉँग्रेसशी चर्चा केल्यानंतरच महापौर पदाच्या निवडणुकीत कोणासोबत जायचे, याचा निर्णय होईल, असे विखे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)गेलेल्यांची गय करणार नाहीकॉँग्रेसचे नगरसेवक संजय लोंढे, मुद्दसर शेख, जयश्री सोनवणे हे नगर शहरात नाहीत. पक्षाच्या लोणी येथील बैठकीलाही ते नव्हते. त्यांना माघारी येण्याची संधी दिली जाईल. ते न आल्यास कॉँग्रेस पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. कायदेशीर प्रक्रिया करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी भूमिका विखे यांनी मांडली.
‘प्रदेश’शी चर्चेनंतरच कॉँग्रेसचा निर्णय
By admin | Published: June 13, 2016 11:12 PM