परभणी : आघाडीची मते फुटल्याने काँग्रेसचे उमेदवार सुरेश देशमुख यांचा पराभव झाल्याचे स्पष्ट झाले आहे़ आघाडीच्या वाटपात परभणीची जागा काँग्रेसकडे गेली़ आ. बाबाजानी दुर्राणी नाराज झाले होते़त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करून राजीनाम्याचे हत्यारही उपसले नंतर राष्ट्रवादीच्या नाराज नेत्यांनी आघाडीच्या उमेदवाराला विजयी करू, अशी भूमिका घेतली़ परंतु, राष्ट्रवादीची मते फुटल्याचे दिसून येते़ काँग्रेसचीही काही मते फुटली़ मतदार संघात काँग्रेसचे १३५ तर राष्ट्रवादीचे १६२ असे २९७ सदस्यांचे संख्याबळ असतानाही आघाडीच्या उमेदवाराला २२१ मते मिळाली़ शिवसेनेचे खा़ बंडू जाधव यांनी आखलेली रणनीती कामाला आली़ त्यामुळेच बाजोरिया यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला़ शिवसेनेकडे दोन्ही जिल्ह्यात मिळून ९७ व भाजपाचे ५१ अशी एकूण १४८ मते असताना बाजोरिया यांनी तब्बल २५६ मते मिळवित देशमुख यांचा ३५ मतांनी पराभव केला़ विशेष म्हणजे बाजोरिया यांनी अपक्ष मतदारांनाही आपल्याकडे खेचण्यात यश मिळविले़पिता-पुत्र विधान परिषदेत : विप्लव बाजोरिया यांचे वडील आ़ गोपीकिशन बाजोरिया हे वाशिम-बुलडाणा-अकोला स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत़ त्यामुळे आता विधान परिषदेत हे पिता-पुत्र एकत्रित दिसतील़
आघाडीची मते फुटल्यानेच काँग्रेसचा पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:02 AM