मी स्वत: लक्ष घालेन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही; काँग्रेसची नाराजी दूर होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 09:05 AM2022-02-18T09:05:01+5:302022-02-18T09:05:53+5:30

काँग्रेसकडील खात्यांना न्याय निधी वाटप होईल यासाठी स्वत:लक्ष घालू, असे मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला सांगितले.

Congress delegation meets CM Uddhav Thackeray, promise to remove resentment | मी स्वत: लक्ष घालेन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही; काँग्रेसची नाराजी दूर होणार

मी स्वत: लक्ष घालेन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही; काँग्रेसची नाराजी दूर होणार

Next

मुंबई : काँग्रेसच्या मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांवर निधी वाटपाबाबत अन्याय होणार नाही यासाठी मी स्वत: लक्ष घालेन, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला गुरुवारी दिली. वर्षा निवासस्थानी भेटलेल्या या शिष्टमंडळात काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आदींचा समावेश होता. यावेळी मंत्र्यांनी त्यांच्या खात्यांवर होत असलेल्या अन्यायाचा पाढा मुख्यमंत्र्यांसमोर वाचला. विशेषत: राष्ट्रवादीकडील खात्यांनाच निधी वाटपाबाबत झुकते माप दिले जात असल्याची तक्रारही करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले. 

ऊर्जा विभागाकडे ग्रामविकास आणि नगरविकास विभागाची ९ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. वित्त विभागाकडून ती दिली जात नाही. महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांना कात्री लावण्याची पाळी आली आहे. नवीन रस्ते, रस्ते दुरुस्ती आदी कामे निधीअभावी रखडत आहेत, याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबतही चर्चा झाली. आगामी अधिवेशनात ही निवड होण्यात कोणतीही अडचण येऊ नये, अशी भूमिका शिष्टमंडळाने मांडली. 

बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी पत्रकारांना सांगितले की, काँग्रेसकडील खात्यांना न्याय निधी वाटप होईल यासाठी स्वत: लक्ष घालू, असे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितले. या शिष्टमंडळात ऊर्जामंत्री नितीन राऊत  वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर, गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांचाही समावेश होता.

राऊतांच्या आरोपांच्या चौकशीची मागणी
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांवर केलेल्या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने यावेळी केली. हे आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यांची चौकशी तातडीने सुरू करण्याचे निर्देश द्यावेत, असे साकडे शिष्टमंडळाने घातले.

Web Title: Congress delegation meets CM Uddhav Thackeray, promise to remove resentment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.