नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 10:52 AM2024-11-25T10:52:00+5:302024-11-25T10:52:33+5:30
Maharashtra Congress: राज्यात आमचीच सत्ता येईल इथपासून ते काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असा दावा करणारे दिग्गज नेते स्वतःचाच मतदारसंघ वाचवू शकले नाहीत.
Congress Nana Patole ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगत होती. यासंदर्भातील बातम्याही अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाल्या. मात्र प्रदेश काँग्रेसकडून याबाबतचा खुलासा करण्यात आला असून नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नसल्याचं सांगत पक्षाकडून यासंदर्भातील वृत्ताचं खंडन करण्यात आलं आहे.
नाना पटोले यांच्या राजीनाम्यासंदर्भातील बातम्या असत्य आहेत आणि खोडसाळपणे पसरवल्या जात आहेत, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने म्हटलं आहे. त्यामुळे तूर्तास तरी नाना पटोले हेच राज्यात काँग्रेसचं नेतृत्व करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मविआतील घटकपक्षांसह काँग्रेसची खराब कामगिरी; पटोले काठावर पास
काँग्रेसचे बड़े मोहरे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत गळाले. पक्षाला मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला आहे. बाळासाहेब थोरात, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे अशा दिग्गज नेत्यांना मतदारांनी पराभवाचा धक्का दिला आहे. राज्यात आमचीच सत्ता येईल इथपासून ते काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असा दावा करणारे दिग्गज नेते स्वतःचाच मतदारसंघ वाचवू शकले नाहीत. स्वत: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे साकोली मतदारसंघातून काठावर विजयी झाले आहेत.