Solapur Congress News: लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजपाला चांगलाच धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. ४०० पारचा नारा दिला असला तरी प्रत्यक्षात मात्र २४० जागांवर भाजपाला समाधान मानावे लागले. एनडीएला जनतेने स्पष्ट बहुमत दिले असून, मित्र पक्षांच्या मदतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तिसरी टर्म सुरू झाली आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीला चांगला जनाधार मिळाला असून, २३० पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. केंद्रात एनडीएचे नवे सरकार स्थापन होऊन अवघे काही दिवस झाले असून, हे सरकार लवकरच पडेल, असा दावा इंडिया आघाडी तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. सोलापूर येथील काँग्रेस नेत्यांनी अशाच प्रकारचा दावा करत, प्रणिती शिंदे कॅबिनेट मंत्री होतील, असे भाकित केले आहे.
माजी आमदार दिलीप माने यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदार महाविकास आघाडीचा आमदार असेल. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सहाही विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसला लीड मिळाले आहे. जनता ही भाजपाच्या आमदारांना आणि भाजपाच्या सरकारला वैतागली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाचा सुफडा साफ होईल आणि राज्यात सत्ता परिवर्तन होईल, असा दावा केला आहे.
इंडिया आघाडीचे सरकार येईल अन् प्रणिती शिंदे मंत्री होतील
एनडीए सरकार कोसळणार आणि इंडिया आघाडीची सरकार केंद्रात स्थापन होईल. खासदार प्रणिती शिंदे लवकरच केंद्रात कॅबिनेट मंत्रीपदावर विराजमान होतील, असेही दिलीप माने म्हणाले. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदेंना मताधिक्य देणारे दिलीप मानेंच्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, खासदार प्रणिती शिंदे या सोलापूर शहर मध्य विधानसभेच्या तीन वेळा आमदार राहिल्या आहेत. खासदार झाल्याने सोलापूर शहर मध्यमध्ये काँग्रेसचा उमेदवार कोण असणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. यावर बोलताना माने म्हणाले की, सोलापूर शहर मध्यमधून काँग्रेसचाच उमेदवार असेल. पण, पक्षश्रेष्ठी उमेदवार ठरवतील. विधानसभा निवडणुकीत तगडा उमेदवार द्यावा लागेल.