महाराष्ट्रात काँग्रेसकडे एक नेतृत्व नाही, निवडणुकीत चेहरा लादता येत नाही - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 08:17 PM2024-08-15T20:17:18+5:302024-08-15T20:20:47+5:30

उद्धव ठाकरे हा महाराष्ट्राचा चेहरा बनलेत. आमच्यासाठी तोच चेहरा त्यासाठी ३ पक्षाच्या संसदीय समितीची बैठक बोलवावी याची गरज वाटत नाही असं राऊतांनी सांगितले. 

Congress does not have a leadership in Maharashtra, cannot impose a face in elections - Sanjay Raut on mahavikas Aghadi | महाराष्ट्रात काँग्रेसकडे एक नेतृत्व नाही, निवडणुकीत चेहरा लादता येत नाही - संजय राऊत

महाराष्ट्रात काँग्रेसकडे एक नेतृत्व नाही, निवडणुकीत चेहरा लादता येत नाही - संजय राऊत

मुंबई - निवडणुकीत चेहरा लादता येत नाही. लोक चेहरा ठरवतात. हा आमचा नेता आहे.  महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचं नेतृत्व आहे पण ते एक नाही.  महाराष्ट्रात काँग्रेसचे अनेक नेते, त्यात काही माजी मुख्यमंत्री, मंत्रिपदावर काम केलेले नेते आहेत. प्रत्येकाला मुख्यमंत्री बनण्याची आशा असेल पण तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्याकडे असा काही चेहरा असेल, मुख्यमंत्रिपदाचं नंतर पाहू पण तो त्यांनी जाहीर केला पाहिजे असं विधान करत संजय राऊतांनी केलं आहे. 

संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे हा आमच्यासाठी चेहरा आहेत. तो सांगायला कशाला हवा, तो आहेच. ३ पक्षाच्या संसदीय समितीची बैठक बोलवावी याची मला गरज वाटत नाही. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी जे काम केले त्यामुळे ते आपोआप महाराष्ट्राचा चेहरा झाला. ठाकरे २ होऊ शकते. भविष्यात काय होईल हे येणारा काळ ठरवेल. मविआचे प्रमुख नेते उद्धव ठाकरेच आहेत. अर्थात शरद पवार, राहुल गांधी हेही आहेत. राष्ट्रवादीत शरद पवार हे सर्वोच्च नेते आहेत. आमच्याकडे उद्धव ठाकरे सर्वोच्च नेते आहेत तसं राज्यात काँग्रेसकडे नेतृ्त्व आहे पण एक चेहरा नाही असं त्यांनी सांगितले. टीव्ही ९ च्या मुलाखतीत ते बोलत होते. 

त्याशिवाय काही स्वतंत्र पक्षाचे नेते प्रमुख चेहरा असू शकतात. युती-आघाडीचा प्रमुख चेहरा असू शकतो. महायुतीकडे कोण चेहरा हे सांगू शकतात का? ३ पक्षाचे सरकार आहे. मुख्यमंत्री आहेत परंतु माझ्या चेहऱ्यावर निवडणूक लढवून जिंकणार आहोत असं कुणी सांगू शकत नाही. मुख्यमंत्री असलेल्या पक्षाला लढायला जागाच कमी मिळणार आहेत. त्यांना ५० जागा तरी मिळणार आहेत का? देवेंद्र फडणवीस, अजित पवार आहेत हा ३ पैशांचा तमाशा आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते. शिवसेनाप्रमुखांचे ते चिरंजीव आहेत. शिवसेनासारख्या पक्षाचे पक्षप्रमुख आहेत. ते महाविकास आघाडीचा प्रचार जीवापासून करतात. ते लोकसभेला पाहिले आहे असं संजय राऊतांनी सांगितले. 

दरम्यान, मविआनं लोकसभेत एकत्रित काम केले, एकत्रित प्रचार केला त्यातून आम्ही ३१ जागा जिंकल्या. काही जागा थोडक्यात गेल्या नाहीतर आम्ही ३५ जागा जिंकलो असतो. महाराष्ट्रात ४८ पैकी ३१ जागा हा फार कमी आकडा नाही. आता विधानसभेची निवडणूक आम्हाला जिंकून राज्यात सत्ता मिळवायची आहे. मविआचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उद्या यांचा मेळावा आहे. जिल्हा आणि तालुका स्तरावरील कार्यकर्त्यांनाही आम्ही एकत्र बोलावलं आहे. उद्याचे मेळाव्याचे यजमानपद शिवसेनेकडे आहे. उद्धव ठाकरेंच्या भाषणानं मेळाव्याला सुरुवात होईल अशी माहिती राऊतांनी दिली.  

निवडणुकीत चेहरा हवाच...

लोकसभा, विधानसभा किंबुहना महापालिका असेल एक चेहरा असतो त्यावर बरेच राजकीय परिवर्तन होत असते हा आमचा अनुभव आहे. शरद पवारांचा चेहरा होता म्हणून राष्ट्रवादीला इतक्या जागा मिळाल्या. पवार नसते तर इतक्या जागा मिळाल्या नसत्या. उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याकडे पाहून मतदान झाले. राहुल गांधी होते म्हणून काँग्रेसला १०० चा टप्पा पार करता आला. बिनचेहऱ्याचं राजकारणात, सिनेमातही हिरो लागतो ना तर तो खलनायकासमोर लढण्याची लोकांना प्रेरणा देतो त्यामुळे चेहरा हवा अशी भूमिका संजय राऊतांनी पुन्हा स्पष्ट केली.  

Web Title: Congress does not have a leadership in Maharashtra, cannot impose a face in elections - Sanjay Raut on mahavikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.