सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसचे ‘दुष्काळी अस्त्र’; विदर्भातील दौऱ्यासाठी नेमली समिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 04:07 AM2019-05-12T04:07:17+5:302019-05-12T09:13:49+5:30
राज्याच्या बहुतांश भागात तीव्र स्वरुपाची दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर उपाय योजण्यात राज्य सरकार कमी पडत आहे, असा ठपका ठेवत काँग्रेसने सरकारची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे.
नागपूर : राज्याच्या बहुतांश भागात तीव्र स्वरुपाची दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर उपाय योजण्यात राज्य सरकार कमी पडत आहे, असा ठपका ठेवत काँग्रेसने सरकारची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी विदर्भातील दुष्काळी भागाचा दौरा करण्यासाठी काँग्रेस आमदार व पदाधिकाऱ्यांची एक समितीच नेमली असून समितीला दौरा केल्यानंतर आपला अहवालही प्रदेश काँग्रेसकडे सादर करायचा आहे.
लोकसभा निवडणुकीमुळे दुष्काळी परिस्थिती निवारणाकडे काही अंशी दुर्लक्ष झाले आहे. ही बाब हेरून काँग्रेसने दुष्काळाच्या मुद्यावरून सरकारची कोंडी करण्याची तयारी चालविली आहे. पक्षातर्फे आता दुष्काळी भागाचे दौरे केले जाणार आहेत. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी विदर्भासाठी एक समिती नेमली असून ही समिती तालुक्यातील दुष्काळी भागांना भेट देईल. या समितीच्या दौºयात संबंधित जिल्ह्यातील अध्यक्षांनाही सहभागी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अशी आहे
विदर्भाची समिती
विधानसभेतील उपनेते आ. विजय वडेट्टीवार हे या समितीचे अध्यक्ष आहेत. माजी मंत्री वसंत पुरके, राजेंद्र मुळक, आ. वीरेंद्र जगताप, रणजित कांबळे, सुनील केदार, राहुल बोंद्रे, अमर काळे, नतिकोद्दीन खतीब, अमित झनक व समिती समन्वयक म्हणून प्रवक्ते अतुल लोंढे यांचा समावेश आहे.